
फलटण विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला असून, ‘मॅपिंग’ नसलेल्या मतदारांची नावे यादीत ठेवण्यासाठी पुराव्यांसह प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०२ सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीची पडताळणी सुरू झाली आहे. यामध्ये ‘मॅपिंग’ न झालेल्या मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत ठेवण्यासाठी आवश्यक पुराव्यांसह उपस्थित राहण्याची सूचना फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
‘मॅपिंग’ नसलेल्या मतदारांना नोटीस
विशेष सखोल पुनरीक्षणाच्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत ज्या मतदारांचे ‘मॅपिंग’ झालेले नाही, अशा मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये कायम ठेवण्यासाठी त्यांना सुनावणीची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित मतदारांनी आवश्यक पुराव्यांसह निश्चित केलेल्या दिवशी उपस्थित राहून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान केली जाणार असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांचीही पडताळणी
मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची यादी राजकीय पक्ष व मतदारांच्या माहितीसाठी संबंधित कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकातील तपशीलानुसार गैरहजर मतदारांची संख्या २ हजार ५३८, स्थलांतरित २० हजार ९४३, मृत १६ हजार ६०६, दुबार ४ हजार ४१० आणि इतर १२० अशी नोंद आहे. या यादीतील नाव वगळण्याबाबत आक्षेप किंवा हरकत असल्यास विहित कालावधीत ती दाखल करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.