राजुरी चौफुल्यातील अपघातानंतर आमदार सचिन पाटील यांचे आदेश; दुभाजकावर तातडीने उपाययोजना

राजुरी चौफुल्यातील अपघातानंतर ग्रामस्थांच्या मागणीची आमदार सचिन पाटील यांनी दखल घेतली. त्यांच्या आदेशानंतर दुभाजकाच्या ठिकाणी तातडीने बॅरिकेडिंग करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ सप्टेंबर : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला-कुरवली पाटी येथे झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोची आमदार सचिन पाटील यांनी दखल घेतली. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी चौकातील दुभाजकाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्यानंतर तातडीने बॅरिकेडिंग करण्यात आल्याची माहिती जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य संतोष गावडे-पाटील यांनी दिली.

ग्रामस्थांनी केली होती दुभाजकाबाबत मागणी

राजुरी चौफुला-कुरवली पाटी येथे आय-ट्वेंटी कार (एमएच १२ झेडसी ९८३४) आणि डिस्कव्हर दुचाकी (एमएच ४२ एपी ९५७७) यांच्यात झालेल्या अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय ४२, रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला होता. विठ्ठल साठे (वय अंदाजे ५२) आणि मोहन गायकवाड (वय अंदाजे ६०) हे गंभीर जखमी झाले होते.

या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थ आणि मृत महिलेच्या नातेवाईकांनी महामार्गावर काही काळ रास्ता रोको केला. राजुरी चौफुल्यात वारंवार होणारे अपघात थांबवण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

आमदार पाटील यांच्या आदेशानंतर तातडीने कार्यवाही

आंदोलनातील काही ग्रामस्थांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत आमदार पाटील यांनी संबंधित विभागाला दुभाजकाच्या ठिकाणी तातडीने बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड लावण्याची कार्यवाही करण्यात आली.

या मागणीसाठी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. आमदार पाटील यांच्या आदेशानंतर त्यावर तातडीने कार्यवाही झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव व भाजपचे प्रदेश सदस्य संतोष गावडे-पाटील यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!