पेशावर : दिलीपकुमार यांच्या पाकिस्तानातील घराच्या खरेदीसाठी निधी झाला मंजूर


स्थैर्य, दि.३: ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार व शाेमॅन राज कपूर यांच्या वडिलाेपार्जित घरांच्या खरेदीसाठी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांत सरकारने २.३५ काेटी रुपये मंजूर केले आहेत. दाेन्ही वास्तू राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी या प्रस्तावाला आैपचारिक मंजुरी दिली आहे. दिलीपकुमार यांच्या वडिलाेपार्जित घराचे क्षेत्रफळ १०१ चाैरस मीटर आहे. ते चार माळ्यांचे घर आहे. त्याची किंमत ८०.५६ लाख रुपये आहे. राज कपूर यांचे सहा मजली घर असून १५१.७५ चाैरस मीटर एवढे त्याचे क्षेत्रफळ आहे. त्याची किंमत १.५० काेटी आहे. दाेन्ही घरांचे रूपांतर संग्रहालयात केले जाणार आहे. त्यासाठी खैबर पख्तुनख्वाच्या पुरातत्त्व विभागाने आराखडा तयार केला आहे. पुरातत्त्व खात्याने प्रांत सरकारला २ काेटी रुपये निधी देण्याची विनंती केली आहे.

दाेन्ही वास्तू माेक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांना जमीनदाेस्त करून तेथे व्यावसायिक गाळे उभे करण्याची जागा मालकांचे प्रयत्न हाेते. परंतु पुरातत्त्व खात्याने या वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले हाेेते.

कपूर हवेली प्रसिद्ध
राज कपूर यांच्या वडिलाेपार्जित घराची आेळख कपूर हवेली अशी आहे. ही हवेली १९१८ ते १९२२ या दरम्यान बांधण्यात आली. राज कपूर यांचे पणजाेबा दिवाण बसवेश्वरनाथ कपूर यांनी ती बांधली हाेती. या वास्तूमध्ये राज कपूर व त्रिलाेक कपूर यांचा जन्म झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातच दिलीपकुमार यांचे १०० वर्षे जुने घर आहे. २०१४ मध्ये तत्कालीन नवाझ शरीफ सरकारने ही वास्तू राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून जाहीर केली हाेती.


Back to top button
Don`t copy text!