फलटण तालुक्याच्या राजकारणात पवारांची एन्ट्री?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 08 मार्च 2024 | फलटण | प्रसन्न रूद्रभटे | आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुतणे तर शरयू कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार हे एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यात रंगू लागल्या आहेत.

त्याचं कारणही तसंच आहे; गेल्या काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांनी थेट बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यालयामध्ये सलग काही दिवस उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत हे नक्की झालं असल्याचं मानलं जात आहे. अजितदादा पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भारतीय जनता पार्टी सोबत गेल्याने त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे मात्र आपले आजोबा शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा आता कामाला लागला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये सर्वजण ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. यामध्ये युवा नेते युगेंद्र पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघांमधील फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून फलटणच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.

युगेंद्र पवार यांना फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्याचं कारण सुद्धा तसंच आहे. फलटण तालुक्यातील कापशी येथे शरयू कारखाना आहे. गेल्या काही वर्षांपासून युगेंद्र पवार हे शरयू कारखान्याचे व्यवस्थापनाचे काम बघत आहेत. यासोबतच कापशी परिसरासह फलटण तालुक्यामध्ये शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून युगेंद्र पवार यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. शरयू कारखान्याच्या माध्यमातून फलटण तालुक्यासह उत्तर कोरेगावमधील सर्वसामान्य शेतकरी व शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर शेतमजुरांची युगेंद्र पवार यांची नाळ जोडली गेली आहे.

आगामी काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा कर्जतचे आमदार रोहितदादा पवार यांच्या समवेत युवा नेते युगेंद्र पवार हे फलटण तालुक्यामध्ये मॅरेथॉन बैठका घेत तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Back to top button
Don`t copy text!