हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी – चंद्रशेखर सिंग

‘गांधी शिल्प बाजार’च्या वतीने औंध (पुणे) येथे हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ मार्च २०२४ | पुणे |
भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी शिल्प बाजारच्या वतीने औंध, पुणे येथे शुक्रवार (दि. ८) पासून राज्यस्तरीय हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे देशातील व राज्यातील कारागीर, हस्तकला कारागीर पारंपरिक कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्र मंत्रालय, भारत सरकार (हस्तकला), वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी केले आहे.

पुणे येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सिंग यांनी सांगितले की, या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना या प्रदर्शनास मोफत प्रवेश आणि वाहनांसाठी मोफत पार्किंग आहे. शुक्रवार (दि. ८ मार्च) ते रविवार (दि. १७ मार्च) या कालावधीत सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पोलिस ग्राउंड, परिहार चौक, बॉडी गेट पोलिस लाईन, औंध, पुणे येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

संयोजक – मे. चरक स्वास्थ्याय बहुउदेशीय संस्था, सांगली व विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार हे भारतीय हस्तकला आणि हातमाग यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणारी प्रमुख राष्ट्रीय एजन्सी हस्तकलेच्या संवर्धन आणि विकासासाठी, हस्तकला कारागीर यांच्या कल्याणासाठी प्रशिक्षण, प्रदर्शन, विक्री योजना वर्षभर वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत राष्ट्रीय गांधी शिल्प बाजार हे आयोजित करत असते. या राष्ट्रीय प्रदर्शनाचा मुख्य उद्देश देशभरातील कारागीर आणि वीणकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या राष्ट्रीय प्रदर्शनात ग्राहक आणि कारागीर यांच्यात थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाते. तसेच ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन गरजेनुसार डिझाइन तयार करून दिले जाते.

www.Indianhandicraft.gov.in या वेबसाईटवर नोंदणी केलेल्या कारागिरांचे १०० स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जी. आय. मानांकन प्राप्त पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसेच सोलापूरी चादर, टॉवेलचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

विविध राज्यांतील विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्यालयातून त्यांची निवड केली आहे. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पगुरू, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्रधारक, राज्य पुरस्कार विजेते, बचत गट इत्यादींचा सहभाग घेण्याची शक्यता आहे.

या प्रदर्शनात आर्ट मेटल वेअर, बीड्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख-शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशेटेड वस्तू, काच, गवत, पाने, वेत वेळू आणि फायबर उत्पादन, हाताने छापलेले कापड स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट क्राफ्ट, तंजावर पेंटिंग, टेक्सटाईल (भरतकाम), लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी क्राफ्ट, विविध पेंटिंग. छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!