उदयनराजेंचा आधार घेत पवारांचा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न : शशिकांत शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.३ : मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका घेतलेली नाही. आता त्यांनी खासदार उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलन व मंडल आयोगाचा आधार घेत “बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला…’ असे आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणी तरी असून, “स्ट्रॉंग मराठा’ नेत्याला लक्ष करण्याचा प्रयत्न कोणाच्या तरी सांगण्यावरून ते करत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे दिले.

मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार व खासदार उदयनराजेंनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या आरोपाचे खंडण करत श्री. शिंदे यांनी पत्रकाद्वारे त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला आहे. (कै.) अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले. त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला एकत्र केले. 1982 मध्ये मराठा आरक्षणाची बीजे रोवली गेली. या आंदोलनात ऍड. शशिकांत पवार हेही सहभागी होते.

अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर नेतृत्व एवढे सक्षम होते, तर मराठा महासंघ पुढे ताकदीने का चालवू शकला नाही, याचे उत्तर पवार यांनी द्यावे, असे श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. मंडल आयोगाची चर्चा करताना 20 वर्षांपासून या विषयावर तुम्ही एक चकार शब्द का काढला नाही? दरम्यानच्या काळात तुम्ही शरद पवार यांच्याकडे सातत्याने येत होता, भेटत होता. त्या वेळी शरद पवार यांच्यापुढे तुम्ही का तक्रारी मांडल्या नाहीत? आदी प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. 

ते म्हणाले, “”मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळे नेते बाजूला झाले. सामान्य कार्यकर्त्यांनी नेतृत्व करून देशाला दिशा दाखविणारे आंदोलन झाले. नेतृत्वाविना हे आंदोलन शांततेत करण्याचा इतिहास घडला व सरकारवर दबाव वाढला. आता या प्रश्‍नावर वेगवेगळी भूमिका मांडून शशिकांत पवार हे मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका मांडली नाही; पण त्यांनी उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलनाचा व मंडल आयोगाचा आधार घेत “बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला…’ असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!