आकाशात झेपावण्याआधीच पाळणे जमिनीवर पडून; मायणीत यात्रा-जत्रांवर निर्बंध


 

स्थैर्य, मायणी (जि. सातारा), दि.५: राज्य सरकारने लॉकडाउन उठवून मिशन बिगीन अगेन सुरू केले. मात्र, गावोगावच्या यात्रा-जत्रांवर अद्याप निर्बंध असल्याने यात्राकाळात आबालवृद्धांचे आकर्षण असलेले आकाशी पाळणे अजूनही जमिनीवरच पडून असलेले दृष्टीस येत आहेत. परिणामी, आर्थिक नुकसानीमुळे पाळणे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. 

गेल्या मार्च महिन्यात येथील सद्‌गुरू यशवंतबाबा महाराज यात्रेसाठी विविध खेळणी व आकाशी पाळणे दाखल झाले होते. मात्र, उभारणी करण्यात येत असतानाच अचानक कोरोनामुळे यात्रा होणार नसल्याचे जाहीर झाले. लॉकडाउन सुरू झाल्याने पाळणे आकाशाच्या दिशेने झेपावण्याआधीच ते जमिनीवर पडून राहिले. त्यामुळे त्या एकमेव व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली. वाहतूक व जिल्हा हद्द बंदीने सर्व लवाजमा यात्रातळावरच पडून राहिला. गेल्या नऊ महिन्यांपासून पाळण्याचे साहित्य खराब होऊ लागले आहे. उत्पन्न नसताना आता साहित्याच्या नुकसानीची भर पडत आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो व्यावसायिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. 

याबाबत येथील खंडोबा माळावर अडकून पडलेले मोहोळ (जि. सोलापूर) येथील आकाशी पाळण्यांचे व्यावसायिक सुभाष चव्हाण म्हणाले, “”माचनूर (ता. पाटण) येथील यात्रा उरकून उस्मानाबाद येथील यात्रेसाठी सर्व साहित्य रवाना केले. सुमारे दोन लाख रुपये भाड्यापोटी द्यावे लागले. तेथे यात्रातळावर सामान उतरवले आणि तासाभरातच यात्रा भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथून अन्यत्र जाण्याचा निर्णय झाला. दरम्यान, मायणीत यशवंतबाबा यात्रा होणार असल्याचे समजले, तरीही खात्री करण्यासाठी कारभारी मंडळीची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत यात्रा होणारच, अशी खात्री कारभारी मंडळींनी दिली. त्यामुळे चार पैसे मिळतील या आशेने पुन्हा लाखभर भाडे खर्चून मायणीत सामान आणून उतरवले.

यात्रातळावर येण्यास विलंब झाल्याने लगेच साहित्याची जोडाजोडी करण्यास सुरवात केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले. परिणामी, पाळणे व खेळण्यांची जोडाजोडी थांबवली. तेव्हापासून आजअखेर कुटुंबातीलच कामगार नुसते आहेत. केवळ भाड्यापोटी लाखोंचे नुकसान झाले.” आता आर्थिक उत्पन्न नसताना दैनंदिन खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. शासनाने लवकरात लवकर काही निर्बंध घालून यात्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!