
स्थैर्य,दि २३: नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पास करण्याची मागणी इंडिया वाईड पँरेंट्स असोसिएशनने केली आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अद्याप अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमच पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार नाहीत असे असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. अनुभा सहाय यांनी सांगितले. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आहे. मात्र नववीत विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागते. पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा किंवा विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलावे, जेणेकरून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास ते लवकर सुरू करू शकतील, असेही अनुभा यांनी स्पष्ट केले.