सौ. वैशालीताई चोरमले यांना राज्य शासनाचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान; पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते गौरव


महाराष्ट्र दिनानिमित्त सातारा येथे सौ. वैशालीताई कृष्णाथ (दादासाहेब) चोरमले यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. २ मे : महाराष्ट्र शासन आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ यंदा मा. सौ. वैशालीताई कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सातारा येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.

सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते सौ. वैशालीताई चोरमले यांना हा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

या सन्माननीय सोहळ्याप्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह महसूल, पोलीस आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

सौ. वैशालीताई चोरमले यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची आणि त्यांच्या कार्याची शासनाने योग्य ती दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार दिला आहे. या महत्त्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सौ. वैशालीताई चोरमले यांचे सातारा जिल्हा आणि फलटण तालुक्यातून सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!