‘डिजिटल अरेस्ट’ करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; पीएसआय योगेश खरात यांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर!


मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ प्रदान. ७० लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी १४ दिवस गुजरात-राजस्थानमध्ये सापळा रचून केली होती आंतरराष्ट्रीय टोळीवर कारवाई.

स्थैर्य, मुंबई, दि. 2 मे : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक (PSI) योगेश बापुराव खरात यांना त्यांच्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत मानाच्या ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने’ (DGP Insignia) गौरविण्यात आले आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) करून वृद्ध नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा त्यांनी अत्यंत शिताफीने पर्दाफाश केला होता. याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे.

नेमके काय होते ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रकरण?

र.अ. की. मार्ग (R.A.K. Marg) पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ सप्टेंबर २०२५ रोजी एका आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला होता. काही अनोळखी भामट्यांनी एटीएस (ATS) कंट्रोल, नवी दिल्ली आणि एन.आय.ए. (NIA) येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. सदानंद दाते बोलत असल्याचे भासवले. तसेच, फिर्यादीचा पीएमएलए (PMLA) आणि ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यात’ सहभाग असल्याचा खोटा बनाव रचून त्यांना व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ करून स्थानबद्ध केल्याची भीती दाखवली. यातून या भामट्यांनी फिर्यादीची तब्बल ७० लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आय.टी. ॲक्ट (IT Act) २००० च्या विविध कलमांन्वये (गु.र.क्र. ३५८/२०२५) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुजरात-राजस्थानमध्ये १४ दिवस तळ ठोकून कारवाई:

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पीएसआय योगेश खरात आणि त्यांच्या पथकाने अत्यंत बारकाईने तांत्रिक तपास सुरू केला. फिर्यादीच्या खात्यातून हस्तांतरित झालेल्या विविध बँक खात्यांची कागदपत्रे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले लॉगिन डिटेल्स (Login Details) तपासले असता, ही टोळी परराज्यातून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात यांनी गुजरात आणि राजस्थानमध्ये तब्बल १४ दिवस रात्रंदिवस सापळा रचून या टोळीतील ६ मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

क्रिप्टोकरन्सीचा वापर आणि ५८ कोटींच्या गुन्ह्यात सहभाग:

केवळ आरोपींना अटक करून हे पथक थांबले नाही, तर गुन्ह्यातील रक्कम ‘क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म’च्या (Cryptocurrency) माध्यमातून थेट ‘यूएस डॉलरमध्ये’ (US Dollars) रूपांतर करणाऱ्या आणखी एका आरोपीलाही त्यांनी बेड्या ठोकल्या. अशा प्रकारे एकूण ७ आरोपींना अटक करून या टोळीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघडकीस आणले. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, तपासादरम्यान या आरोपींचा महाराष्ट्र सायबर सेलकडे (Maharashtra Cyber) तपास सुरू असलेल्या तब्बल ५८ कोटी रुपयांच्या मोठ्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मानाच्या ‘पोलीस महासंचालक पदकाने’ सन्मान:

सायबर गुन्हेगारीच्या या अघोरी आणि तंत्रबद्ध गुन्ह्यांचा मुळापासून छडा लावणाऱ्या या उल्लेखनीय कारवाईची वरिष्ठ पातळीवरून विशेष दखल घेण्यात आली. ‘प्रवर्ग २’ (दरोडेखोर/गुन्हेगारांच्या टोळ्या किंवा अघोर व तंत्रबद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध केलेली कारवाई) या सदराखाली पीएसआय योगेश बापुराव खरात यांना यावर्षीचे मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DGP Medal) देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलातून आणि सर्वसामान्यांमधून त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!