भाच्याने केला आत्याचा निर्घृण खून


दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | सातारा |
जेवण दिले नाही म्हणून वत्सला नामदेव बाबर (वय ७०) या वृद्ध आत्याचा भाच्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी भाच्यास अटक केली आहे. हरीदास सुरेश चव्हाण (वय ३०) असे पोलिसांनी अटक केलेल्या भाच्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी हरिदास चव्हाण याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आत्या वल्सला बाबर यांच्याकडे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्री हरिदासने आत्याला जेवण मागितले. मात्र, त्याला वेळेवर जेवण न दिल्याने त्याने वत्सला बाबर यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. यामुळे जखमी झालेल्या आत्याचा भाच्याच्या मारहाणीत जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर हरिदास हा तेथून पसार झाला.

या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी आरोपीच्या शोधासाठी दोन टीम तयार केल्या. या दोन्ही टीमने अवघ्या दोन तासात आरोपीला गावच्या परिसरातूनच अटक केली. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर लहानचं मोठं केलेल्या भाच्यानेच अशा प्रकारे आत्याचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!