
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून फलटणला अप्पर जिल्हाधिकारी आणि साखरवाडीत अप्पर तहसीलदार कार्यालयाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २३ जून : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे. शासनाच्या महसूल विभागाने फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि साखरवाडी (पिंपळवाडी) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, फलटण येथे नव्याने सुरू होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय असणार आहे. या कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात फलटण, माण आणि खटाव या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांची महत्त्वाची प्रशासकीय कामे अधिक वेगाने आणि सोयीस्कररीत्या मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
तसेच, फलटण उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची स्वतंत्र अधिसूचना जारी केली आहे. या नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात होळ, तरडगाव आणि आदर्की बुद्रुक या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
या दोन्ही महत्त्वपूर्ण कार्यालयांच्या मंजुरीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले आहेत.
