दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
बारामतीतील सिद्धेश्वर मंदिराशेजारी २५० वर्षांपासून श्री दुर्गादेवी मंदिर असून बारामतीचे पूर्वीचे नाव भीमथडी असल्यापासून हे मंदिर प्रचलित आहे.
पुणे येथील श्रीमंत पेशवे कुटुंबीयांचे वकील व बारामतीचे सरदार गोविंदराव कृष्णराव काळे यांनी त्यावेळी दुर्गादेवीची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. हे मंदिर प्राचीन असून दुर्गा पंचायतन पध्दतीची आहे. घटस्थापना केल्यानंतर विविध रूपामध्ये व वेगवेगळ्या वाहनावर आरूढ पूजा बांधण्यात येते. नवरात्रनिमित्त दर्शनासाठी बारामतीसह विविध परिसरातून अनेक भाविक येत असतात.
पहिल्या दिवशी वाघ, दुसर्या दिवशी सिंह, तिसर्या दिवशी हत्ती, चौथ्या दिवशी मोर, पाचव्या दिवशी हरीण, सहाव्या दिवशी गरूड, सातव्या दिवशी घोडा, आठव्या म्हणजे दुर्गाष्टमीला महिषासूर वध करताना श्री दुर्गादेवीचे अक्राळ-विक्राळ रूप व हातात त्रिशूल, पायाखाली महिषासूर राक्षस अशाप्रकारे देवीची पूजा बांधली जाते व नवव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला युद्ध झाल्यावर देवी पाळण्यात बसवली जाते. अशाप्रकारे नववा दिवस हा देवीचा विश्रांतीचा दिवस व दहाव्या दिवशी देवी अंबारीत बसत,े म्हणजेच दहावा दिवस हा देवीचा विजयोत्सव असतो. हा दसरा म्हणजेच विजयादशमी काळे यांच्या मंदिरात आतिशय आनंदात व भक्तीभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या मंदिराभोवती अनुक्रमे श्री विष्णूनारायण, श्री शंकर, गणेश सूर्यनारायण व मध्यभागी दुर्गादेवी मंदिर आहे. अशाप्रकारे दुर्गा पंचयातनची रचना या मंदिरामध्ये आहे.
दुर्गा सप्तशती पाठ प्रवचन, सूक्त पठण, दुर्गा भागवत, ललित स्तोत्र वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिर व्यवस्थापक संजय शिंदे, श्रीनिवास शिंदे, आनंत शिंदे व शिंदे परिवार पाहात असतात. वर्षभर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले असते, पण नवरात्र उत्सवात पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापन अनंतराव शिंदे यांनी केले आहे.