कोरोनासाठीच्या साहित्य खरेदीवरून गदारोळ, सातारा पालिकेची वर्षभरानंतर ऑनलाईन सभा : 41 विषयांना मंजूरी


स्थैर्य, सातारा दि.४: कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली झालेल्या मनमानी साहित्य खरेदीचा नगरसेवक वसंत लेवे यांनी बुधवारी भांडाफोड केला. पाचशे फेस मास्क खरेदीचे वाटपच झाले नसून करोना साहित्य खरेदीच्या भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात बरबटल्याचा आरोप लेवे यांनी करून प्रशासनाने मढ्याच्या टाळूवरचं लोणी खात असल्याची जळजळीत टीका केली. आरोग्य निरिक्षक सुहास पवार सभेस का उपस्थित नाही असा सवालही त्यांनी केला. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेउून करोना प्रतिबंध साहित्य खरेदीच्या कार्योत्तर प्रस्तावास स्थगिती देण्यात आली.सातारा नगरपालिकेची ऑनलाईन सभा तब्बल वर्षभराच्या अंतराने बुधवारी छत्रपती शिवाजी सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाली. सभेत सदस्यांची आक्रमकता आणि नेटवर्कची तांत्रिक अडचण अशा गोंधळात एक्के चाळीस विषयांना नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली.

सभेच्या पहिल्या सत्रातच कोरोना संक्रमणाच्या काळात काम केलेल्या कर्मचार्‍यांना केवळ एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. हा प्रकार म्हणजे कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी टीका करून नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. मात्र, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी खंदारे यांची समजूत घालत तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

कोरोना साहित्य खरेदीसाठी नेमण्यात आलेल्या वरद एजन्सीच्या कार्योत्तर प्रस्तावाच्या मंजूरीवरून मोठा गदारोळ झाला. अव्वाच्या सव्वा किंमतीने खरेदी झालेले साहित्य कोणाला दिले, त्यांची नोंद आहे का? साहित्य खरेदी नंतर नगांची नोंद पालिकेच्या रजिस्टर मध्ये का नाही, इन्फ्रारेड थर्मामीटर, पाच शे फेसशिल्ड, पॉवर स्प्रे पंप, एन-95 चे मास्क, पाच शे रबरी मोजे, या साहित्याची काय विल्हेवाट लावली? साहित्य खरेदीच्या भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात बरबटले असून त्यांनी मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार केल्याची सडकून टीका नगरसेवक वसंत लेवे यांनी केली. जर निलंबित केलेल्या आरोग्य निरिक्षकांचे ठराव सभेत मंजूरीसाठी येत असतील तर ते योग्य आहे काय ? असा सवाल लेवे यांनी करत प्रभारी आरोग्य निरीक्षक सुहास पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. .कोरोनाच्या काळात झालेल्या साहित्य खरेदीचा तपशील सर्व नगरसेवकांना कळावा, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरण्यात आल्याने हा विषय तहकूब करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले. सुहास पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांना नोटीस काढण्याची सूचना नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली.

घरपट्टी मध्ये व्यावसायिकांना तीन महिने सवलत देण्याच्या विषयावर तसेच खुल्या जागा ताब्यात घेण्याच्या विषयांवर अशोक मोने आक्षेप घेतला. जागांचा विषय मोघम आहे. त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी खुल्या जागा किती अशी उपसूचना त्यांनी मांडली. पक्ष प्रतोद अमोल मोहिते व अविनाश कदम यांनी केवळ व्यावसायिकांनाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही ही तीन महिन्यासाठी घरपट्टी शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी केली. नगर विकास आघाडीच्या बहुतांश सदस्यांनी सभा ऑनलाईन असताना सभागृहात प्रत्यक्ष सामाईक अंतर राखत उपस्थिती दर्शविली. सभागृहात कास धरण उंची व मेडिकल कॉलेजला निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र व ग्रेड सेपरेरटरच्या पूर्ततेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अभिनंदनाच्या ठरावांना सभागृहाने मान्यता दिली.


Back to top button
Don`t copy text!