सातारा शिवसेनेत भडका: मुलाखतींवरून निष्ठावंत विरुद्ध लाभार्थी संघर्ष; चंद्रकांत जाधव आणि रणजितसिंह भोसलेंचा संताप

शिवसेनेतील (शिंदे गट) पदाधिकारी निवडीसाठी आज फलटण येथे होणाऱ्या मुलाखतींवरून सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. ‘काल आलेल्यांनी ३० वर्षे खस्ता खाणाऱ्यांच्या मुलाखती घ्यायच्या का?’ असा रोकडा सवाल करत निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षातील ‘लाभार्थी’ नेत्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 14 जून : शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती आज (दि. १४ जून) कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र, या मुलाखत प्रक्रियेला सातारा जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी कडाडून विरोध दर्शवला असून पक्षात ‘निष्ठावंत विरुद्ध लाभार्थी’ असे शीतयुद्ध उफाळून आले आहे.

मुलाखत घेणाऱ्यांच्या नावांवरूनच आक्षेप

या मुलाखतींसाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील आणि महिला आघाडी संपर्कप्रमुख रेश्मा जगताप यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, याच नावांवर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

चंद्रकांत जाधव यांचा थेट सवाल

सातारा जिल्ह्यातील धडाडीचे नेते व विद्यमान जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘शिवसेनेत सहा महिन्यांपूर्वी आलेले संजीवराजे, रेश्मा जगताप आणि चंद्रहार पाटील हे तीस वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्यांच्या मुलाखती घेणार का?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, फलटणच्या राजे गटाचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणण्यात जाधव यांचा मोठा वाटा होता. ‘या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर किती लढाया लढल्या? त्यांच्यावर किती केसेस पडल्या? त्यांनी किती शिवसैनिक तयार केले?’ असे प्रश्नांचे बाण जाधव यांनी सोडले आहेत.

रणजितसिंह भोसलेंचा गौप्यस्फोट: ‘पक्षात लाभार्थ्यांची टोळी’

चंद्रकांत जाधव यांच्या भूमिकेचे समर्थन करत सातारा व वाई विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनीही नाराजीचा बार उडवला आहे. ‘पक्षात सध्या लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत असे शीतयुद्ध सुरू आहे. निष्ठावंतांचे खच्चीकरण करून स्वतःला महत्त्व प्राप्त करण्यासाठी काही लोक नको त्या व्यक्तींना ताकद देत आहेत,’ असा गंभीर आरोप भोसले यांनी केला आहे. ‘शिवसेनेत नियुक्त्या आदेशाने होतात, मुलाखतींचे नाटक करून येथे काँग्रेस संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे,’ अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

श्रेष्ठींनी दखल घेण्याची मागणी

यापूर्वी जिल्हाप्रमुख जयवंतराव (माऊली) शेलार यांनीही पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडूदादा सपकाळ आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर निष्ठावंतांची हीच व्यथा मांडली होती. पक्षाच्या मुख्य नेत्यांनी या वरिष्ठ नेतृत्वापासून जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना वाचवावे, अन्यथा येत्या पदाधिकारी बैठकीत ही खदखद उघडपणे बाहेर पडेल, असा स्पष्ट इशारा भोसले यांनी दिला आहे. आजच्या मुलाखत प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Back to top button
Don`t copy text!