
नीरा प्रणालीतील धरणांमध्ये सद्यस्थितीला केवळ ५.२७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १५ जून : नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत येणाऱ्या नीरा प्रणालीतील धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून सद्यस्थितीला धरणांमध्ये केवळ १०.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. १५ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चारही धरणांमध्ये मिळून अवघा ५.२७ टीएमसी साठा राहिल्याने चिंता वाढली आहे.
पाणीसाठ्यात मोठी घट
नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चार प्रमुख धरणांची एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ४८.३३ टीएमसी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ८.०३ टीएमसी (१६.६१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी मात्र त्यात मोठी घट होऊन हा साठा ५.२७ टीएमसीवर खाली आला आहे.
धरणनिहाय सद्यस्थिती
अधिकृत अहवालानुसार, भाटघर धरणात सध्या १.८६ टीएमसी (७.९१ टक्के) पाणी शिल्लक आहे. वीर धरणात १.७३ टीएमसी (१८.३८ टक्के) उपयुक्त साठा आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ४.२५ टीएमसी इतका भक्कम होता. नीरा देवघर धरणात १.०१ टीएमसी (८.६१ टक्के) तर गुंजवणी धरणात अवघा ०.६७ टीएमसी (१८.१६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.
कालव्यांचा विसर्ग बंद
सिंचन हंगाम पूर्ण झाल्यामुळे सध्या नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालवा या दोन्ही कालव्यांचा विसर्ग पूर्णपणे बंद (शून्य) करण्यात आला आहे. १ मार्चपासून आतापर्यंत नीरा डाव्या कालव्यातून ७.३० टीएमसी तर नीरा उजव्या कालव्यातून १३.०९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणांची खालावलेली स्थिती पाहता पावसाचे आगमन होईपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.