फलटण: भारतीय बौद्ध महासभेतर्फे सेवापूर्ती सत्कार – मानपत्र प्रदान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण व परिवार यांच्या वतीने छाया गायकवाड आणि विठ्ठल निकाळजे यांच्या सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न.

स्थैर्य, फलटण, दि. १५ जून : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याची माजी कार्यकारिणी व भारतीय बौद्ध महासभा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने छाया राजेंद्रकुमार गायकवाड आणि विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा फलटण येथे नुकताच पार पडला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना कृतज्ञता गौरव मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

धम्मकार्यातील योगदानाचे कौतुक

भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक व समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले म्हणाले की, अनेक जण सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये रमतात. परंतु या दोन्ही सत्कारमूर्तींनी शैक्षणिक कारकिर्दीसोबतच धम्मकार्यामध्ये सक्रिय योगदान दिले आहे. भविष्यातही ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, ज्यांचा सन्मान करीत आहोत ती कुटुंबे धम्म विचारांनी समाजप्रबोधनाची परंपरा जपणारी आहेत. छाया गायकवाड यांना आर. टी. रणवरे यांच्या विचारांचा वारसा लाभला असून त्या चळवळींमध्ये कायम सक्रिय राहिल्या आहेत. तसेच विठ्ठल निकाळजे यांनी तब्बल ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली आहे.

विपश्यना व धम्म चळवळीचा मार्ग

शाखेचे माजी पदाधिकारी सतीश कांबळे यांनी सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मौनामध्ये मोठी शक्ती असून विपश्यना साधना करून त्यांनी आनंदी जीवन जगावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. माजी संस्कार उपाध्यक्ष बजरंग गायकवाड यांनी संकटांचा सामना धम्मविचारांच्या आधारे करावा आणि धम्मकार्याशी निष्ठा कायम ठेवावी, असे मार्गदर्शन केले. बाबासाहेब जगताप यांनी कृतज्ञता गौरव मानपत्राचे वाचन केले.

सत्कारमूर्तींचे मनोगत

सत्काराला उत्तर देताना विठ्ठल निकाळजे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर जगण्याची प्रेरणा दादासाहेब भोसले यांच्याकडून मिळाली. आगामी काळात बौद्ध स्थळांना भेटी देणे, विपश्यना करणे आणि धम्म चळवळीमध्ये सक्रिय योगदान देण्याचा माझा मनोदय आहे.

छाया गायकवाड यांनीही सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुटुंबावर दाखवलेले प्रेम नवी ऊर्जा देणारे असून येणाऱ्या काळात धम्म चळवळीत सहभागी होऊन फुले-शाहू-आंबेडकर चळवळ अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व बौद्ध पद्धतीने विधी संचालन शाखेचे माजी अध्यक्ष व बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी केले. या सोहळ्यास अमोल भोसले, अमोल काकडे, आनंद जगताप, विजयकुमार जगताप, प्रशांत सोनवणे, विकास गायकवाड, रामचंद्र मोरे, ॲड. चंद्रशेखर मोरे, विजय निकाळजे, पारिजातका जगताप, भाग्यश्री निकाळजे, योगिता घोरपडे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!