साखरवाडी: ग्रामपंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर – हालचालींना वेग

फलटण तालुक्यातील साखरवाडी-पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने निवडणूक अटीतटीची होणार असून पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

स्थैर्य, साखरवाडी, दि. १५ जून : फलटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या साखरवाडी-पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुले) राहिले असून थेट जनतेतून निवड होणार असल्याने गावात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.

मागील निवडणुकीचा संदर्भ

साखरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक तालुक्याच्या राजकारणात नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. २०२१ च्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गट आणि विक्रमसिंह भोसले यांची राष्ट्रवादी विधायक विकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. त्यावेळी विक्रमसिंह भोसले यांनी सत्ता मिळविली होती. सद्यस्थितीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात विक्रमसिंह भोसले यांची कन्या शिवांजली भोसले या पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा सांभाळत आहेत.

बदललेली राजकीय समीकरणे व आरक्षण

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदा साखरवाडीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट सामना रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने लढत रंजक ठरणार आहे.

जाहीर झालेले वार्डनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे:

  • वार्ड १: ओबीसी महिला, खुला महिला, सर्वसाधारण

  • वार्ड २: अनुसूचित जाती, खुला महिला, सर्वसाधारण

  • वार्ड ३: ओबीसी, खुला महिला, सर्वसाधारण

  • वार्ड ४: अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण

  • वार्ड ५: अनुसूचित जाती महिला, ओबीसी महिला, खुला महिला

  • वार्ड ६: ओबीसी, खुला महिला, सर्वसाधारण पुरुष

आरक्षणाच्या या नव्या रचनेमुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितांमध्ये बदल झाला आहे. विद्यमान सदस्यांचे वार्ड बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, महिला आरक्षणामुळे अनेक कुटुंबांमधून नव्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

परिसरातील मतदारसंख्या, सहकारी संस्था आणि स्थानिक नेतृत्व यामुळे ही निवडणूक तालुकाभर चर्चेचा विषय ठरणार आहे. आगामी काळात उमेदवारांची घोषणा आणि आघाड्यांवरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

Back to top button
Don`t copy text!