मराठा आरक्षण : महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षण मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी – खासदार संभाजीराजे छत्रपती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 स्थैर्य, कोल्हापूर, दि.१४: महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण ठरवाल त्यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र पाठवले आहे.

संभाजीराजे यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे.

हे करत असताना न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50% पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अश्या प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे.

केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण दिले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे.

माझी सर्वांना एक विनंती राहील की आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33% च्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!