
थेट WhatsApp वर मिळवा
दत्तनगरच्या चिमुकल्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी थेट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे घर गाठले. मुलांच्या आग्रहाखातर निंबाळकरांनी त्यांच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट दिली.
स्थैर्य, फलटण, दि. २१ सप्टेंबर : फलटण शहरातील दत्तनगर परिसरातील चिमुकल्या मुलांनी आपल्या गणेश मंडळासाठी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि निरागस हट्ट सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि गणेश मंडळाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून भेट द्यावी, अशी या मुलांची तीव्र इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी या चिमुकल्या कार्यकर्त्यांनी थेट रणजितदादांचा बंगला गाठण्याचा निर्णय घेतला.
घरातील मोठ्या मंडळींना काहीही न सांगता, या मुलांनी स्वतः रिक्षा केली आणि थेट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. तिथे पोहोचून त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि हक्काने रणजितदादांना आपल्या गणेश मंडळाला भेट देण्याची विनंती केली. मुलांचा हा निरागस आग्रह आणि त्यांच्या मनात बाप्पाविषयी असलेली आत्मीयता पाहून रणजितदादाही भारावून गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलांच्या या भावनेचा मान ठेवत दत्तनगर येथील त्यांच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट दिली.
माजी खासदारांनी आपल्या आग्रहाला लगेच होकार देत थेट मंडळात हजेरी लावल्याचे पाहून या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्यासाठी हा प्रसंग निश्चितच अविस्मरणीय ठरला. आजच्या काळात एवढ्या लहान वयात मुलांनी आपल्या गणेश मंडळाशी जोडलेली नाळ, त्यांची एकजूट आणि मोठ्या व्यक्तीसमोरही न डगमगता आपली इच्छा व्यक्त करण्याचा त्यांचा आत्मविश्वास खरोखरच कौतुकास्पद आहे. दत्तनगरमधील या चिमुकल्यांनी दाखवलेली इच्छाशक्ती यामुळे परिसरात त्यांच्या या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे.
चिमुकल्यांच्या प्रेमाचा आणि निरागस आग्रहाचा मान ठेवत त्यांच्यात अगदी सहजतेने सहभागी झालेल्या रणजितदादांच्या या भेटीमुळे दत्तनगर परिसरातील गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि आनंदात आणखीच रंगत आली.