खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी एसटीचा मास्टरप्लॅन; ताफ्यात येणार २०० नव्या व्होल्वो बसेस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

खासगी आरामदायी बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २१ सप्टेंबर : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी आराम बससेवेला पसंती देणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक आणि वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असून, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्होल्वो बसेसचा समावेश केला जात आहे.

दिवसा आरामदायी आणि रात्री शयनयानाची सोय

२५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीनुसार या बसेस चालवल्या जाणार आहेत. दिवसा प्रवासासाठी ४५ आसनी आरामदायी बसेस, तर रात्रीच्या लांबच्या प्रवासासाठी ३० ते ४५ क्षमतेच्या शयनयान बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रवाशांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस सुरक्षित, वेगवान अन् सुटसुटीत प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

डिजिटल तिकीट बुकिंग आणि हाय-एंड आतिथ्य सेवा

या नव्या बससेवेसाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच खासगी ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही बुकिंग करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाईलद्वारे घरबसल्या तिकीट आरक्षित करता येईल. याशिवाय, प्रवाशांना उत्तम सेवा आणि स्वच्छता पुरवण्यासाठी खासगी यंत्रणेमार्फत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घेऊन बसमध्ये विशेष आतिथ्य सेवा पुरवली जाणार आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!