
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुका दूध संघ आणि श्रीराम कारखान्याच्या सद्यस्थितीवरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २१ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील सहकारी संस्था जाणीवपूर्वक मोडीत काढून स्वतःच्या खासगी संस्था मोठ्या केल्या जात आहेत. फलटण तालुका दूध संघ आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण लढा देत असून, दूध संघाच्या मालमत्तेचा होणारा लिलाव अत्यंत निषेधार्ह आहे, असा घणाघाती आरोप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार सचिन पाटील, फलटण तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष भीमदेव बुरुंगले, जेष्ठ नेते सोमशेठ जाधव, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सदस्य धनंजय साळुंखे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन सुभाष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दूध संघाची जाणीवपूर्वक राखरांगोळी
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, एका काळात लाखो लिटर दूध संकलन असणारा हा संघ आता कागदोपत्री केवळ काही हजार लिटरवर आला आहे. प्रत्यक्षात येथे एक थेंबही दूध संकलन होत नाही. सहकारी संस्था बंद पाडून यांचा खासगी दूध संघ चौपटीने वाढवण्यात आला. हजारो शेतकऱ्यांचा संसार असलेल्या या दूध संघाचा लिलाव काढण्यात आला आहे, याला आपला तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीराम कारखान्याबाबत फसवणुकीचा आरोप
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडत असल्याचे निंबाळकर म्हणाले. कारखान्याची ४५ एकर जमीन विकणे आणि तो खासगी व्यापाऱ्यांच्या घशात घालणे, हा विकास असू शकत नाही. सभासदांकडून लाखो रुपये गोळा करून त्यांची फसवणूक केली जात आहे. मागील ३० वर्षांच्या काळात तालुक्यातील खरेदी-विक्री संघ, फलटण ट्रेडर्स यांसारख्या अनेक संस्था अडचणीत आणल्या गेल्या. आम्ही या संस्था वाचवण्यासाठी आणि तालुक्याला योग्य दिशा देण्यासाठी मैदानात उतरलो आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दीड कोटी फायद्यात असणारा संघ अडचणीत कसा?
दूध संघाचे माजी अध्यक्ष भीमदेव बुरुंगले यांनी यावेळी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. आपल्या कार्यकाळात ५६ हजार लिटर दूध संकलन करून संघाला दीड कोटी रुपयांच्या नफ्यात आणले होते. शेतकऱ्यांची प्रलंबित देणीही दिली होती. मात्र, त्यानंतर आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले. आता पुन्हा संधी मिळाल्यास हा संघ यशस्वी करून दाखवू, असा विश्वास बुरुंगले यांनी व्यक्त केला.