स्थैर्य, कोयनानगर, दि.११: कोयना धरणाचे वाया जाणारे पाणी मुंबईला दिले तर काही बिघडणार नाही. उलट वाया जाणारे पाणी मुंबईला देता येत असेल, तर त्यात काही राजकारण नसल्याचे स्पष्ट मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या दो-यानंतर केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची धावती भेट घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कोयना धरणाच्या भिंतीवरून प्रकल्पाची पाहणी केली. तद्नंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. दरम्यान, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला व कोयनेच्या पाणी प्रश्नावर चर्चा केली.
देसाई पुढे म्हणाले, कोयना धरणातून वापरून झालेले पाणी पश्चिमेकडे वळविले जाते. ते मुंबईला देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तसेच वाया जाणारे पाणी मुंबईला दिले तर काही बिघडणार नाही. उलट वाया जाणारे पाणी मुंबईला देता येत असेल तर त्यात काही राजकारण आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, तरीही त्यावर काहीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे राजकारणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. वाया जाणारे पाणी मुंबईला वळविल्यास तेथील विविध व्यवसायांना चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.