फलटण शहरात १ मे पासून ‘डिजिटल जनगणने’ला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणने’चा पर्याय उपलब्ध – मुख्याधिकारी निखील जाधव


फलटण नगरपरिषद हद्दीतील १६ व्या जनगणनेचे कामकाज १ मे पासून सुरू होत आहे. ही जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखील जाधव यांनी दिली.

स्थैर्य, फलटण, दि. ३० एप्रिल : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण नगरपरिषद हद्दीतील १६ व्या जनगणनेचे काम लवकरच सुरू होत आहे. विशेष म्हणजे, यंदाची ही जनगणना प्रशासनामार्फत प्रथमच पूर्णपणे ‘डिजिटल’ (Digital) स्वरूपात मोबाईल ॲपच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखील जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भारत सरकारचे महा-रजिस्ट्रार आणि महाराष्ट्र शासन जनगणना संचालनालय यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पार पडत आहे. जनगणनेच्या माध्यमातून गोळा करण्यात येणारी सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती भविष्यातील विकास योजना आखण्यासाठी व साधनसंपत्तीच्या योग्य वाटपासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.

१ ते १५ मे दरम्यान ‘स्व-गणने’चा पर्याय:

ही जनगणना प्रामुख्याने दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत ‘घर यादी’ आणि ‘घर गणने’चे काम केले जाईल. तत्पूर्वी, १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना census.gov.in या संकेतस्थळावर ‘स्व-गणनेचा’ (Self-enumeration) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे नागरिक स्वतःच्या घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेची माहिती घरबसल्या ऑनलाईन भरू शकतील. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील.

९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती:

शहरातील १३ प्रभागांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ९६ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात साधारणपणे १८० ते २०० घरे आणि ७०० ते ८०० लोकसंख्येचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी ९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, या सर्व कर्मचाऱ्यांना ५ मे ते ७ मे २०२६ या दरम्यान विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विचारले जाणार ३३ प्रश्न; मिळणार स्वतंत्र ओळख क्रमांक:

या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकास प्रगणकांमार्फत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला जनगणनेनंतर एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक प्राप्त होईल, जो भविष्यातील कामांसाठी नागरिकांनी जपून ठेवणे आवश्यक आहे.

ही संकलित होणारी माहिती केवळ आकडेवारी नसून ती राज्याच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याने, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता प्रगणकांना अचूक माहिती द्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी फलटणकरांना केले आहे.


Back to top button
Don`t copy text!