
स्थैर्य, मुंबई, दि.११ : UPA च्या अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवारांच्या खांद्यावर यूपीए अध्यक्षपदाची धुरा येण्याची जोरदार चर्चा राज्याच्या राज्यकारणात सुरु होती. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच जमल्याचं पाहायला मिळालं.
ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवलाय. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसनं गळ घातल्याचंही बोललं जात होतं.
शरद पवार यांचे देशभरातील सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर याचा प्रत्यय आलाय. दरम्यान, UPA च्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी यांनी UPA अध्यक्षपदावर कायम राहण्यास अनिच्छा दर्शवली आहे असं समजतंय. या जागेसाठी योग्य उमेदवार लवकरच मिळेल असंही त्या म्हणाल्या असल्याचं समजतंय. त्यानंतर UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव प्रामुख्याने पुढे येताना दिसत होतं.
मात्र स्वतः शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. ‘UPA’ च्या अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा नाही’, मी यूपीएचा अध्यक्ष होणार या बातमीत तथ्य नाही’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम लागलाय.