
येवल्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येवला-नांदगाव आणि येवला-भारम रस्त्यांवरील दोन रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल (ROB) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
स्थैर्य, मुंबई, दि. २९ : येवला तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच शिर्डीकडे जाणाऱ्या हजारो साईभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन रेल्वे फाटकांवर लवकरच उड्डाणपूल (ROB) उभारले जाणार आहेत. येवला-नांदगाव रस्ता (रामा २५) वरील ‘गेट क्रमांक ७७’ (साखळी क्र. ७७/८००) आणि येवला-भारम रस्ता (रामा ४१२) वरील ‘गेट क्रमांक ७६’ (साखळी क्र. १/१) येथे हे उड्डाणपूल प्रस्तावित असून, यांच्या उभारणीस लवकरच प्रारंभ होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मंत्रालयात पार पडली महत्त्वपूर्ण बैठक
येवला येथील रेल्वे उड्डाणपूल उभारणीसंदर्भात मंत्रालयात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, या बैठकीत संबंधित प्रकल्पाच्या विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
वाहतूक कोंडीतून मिळणार कायमचा दिलासा
येवला-नांदगाव हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग असून तो नाशिक, नांदगाव तसेच जळगाव जिल्ह्याच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख दुवा आहे. येवला येथील प्रसिद्ध पैठणी उद्योग, कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व इतर शेतमालाची वाहतूक, तसेच शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, या रेल्वेमार्गावरून दररोज १०० हून अधिक एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक होत असल्याने हे रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. परिणामी, मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
‘अंडरब्रिज’ऐवजी उड्डाणपुलाला पसंती
पावसाळ्याच्या दिवसांत ‘रेल्वे अंडर ब्रिज’ (RUB) च्या पर्यायामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता असते. भविष्यातील हा धोका लक्षात घेऊनच या ठिकाणी थेट उड्डाणपूल (ROB) उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत आहे. या कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी, यावर बैठकीत विशेषत्वाने चर्चा करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ, ‘इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स’चे (IRSE) विनोद मधुकर भांगळे, उपमहाव्यवस्थापक निलेश यार्हेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, PWD चे उपविभागीय अभियंता सुमेरसिंग पाकल, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
