‘कोयने’ची यंत्रसामग्री बदलणार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर सहकारमंत्र्यांची स्पष्टोक्ती


 

स्थैर्य, कोयनानगर, दि.११: कोयना धरण प्रकल्पाच्या दृष्टीने 1964 पासून आणि त्याही अलीकडच्या काळामध्ये असलेल्या मशिनरी बदलण्याबाबत चर्चा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये झाले आहे, अशी माहिती सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची धावती भेट घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कोयना धरणाच्या भिंतीवरून प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. तद्नंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ते पोफळीकडे रवाना झाले. तेथे त्याची पाहणी केली, प्रकल्पाचे प्रेझेंटेशन पाहिले. त्यानंतर पोफळी ते कोयना धरण रस्ता अरुंद असल्याने त्यांना येण्यास विलंब झाला. कोयना धरणाची पाहणी करताना त्यांनी भिंतीवर आणि प्रकल्पाच्या मशिनरीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी काही सूचना देखील केल्या. आर्थिक तरतूद करण्यासंदर्भात चर्चा केली. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतही त्यांनी काही सकारात्मक चर्चा केली व तो प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्याचीही त्यांनी माहिती घेतली.

श्री. पाटील म्हणाले, कोयना धरणामध्ये प्रकल्पाची सर्व माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. पर्यटनाचा कोणताही हेतू नव्हता. या प्रकल्पामध्ये 1964 आणि 90 ला बसविण्यात आलेल्या मशिनरी खराब झाल्या आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता आहे का याचीही त्यांनी पाहणी केली. त्यादृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण होता. निवेदने देण्यासाठी आलेल्या लोकांनी कोणताही संकोच न करता त्यांची निवेदने सहकार मंत्री म्हणून माझ्याकडे द्यावीत. ती निवेदने त्या-त्या विभागाकडे पूर्तता करण्यासाठी पाठवून देईन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबत सविस्तर कल्पना देईन. आज भेटायला आलेल्या लोकांची काही गैरसोय झाली असल्यास त्याचीही कल्पना त्यांना देईन. मावळ येथे एक्सप्रेस हायवेचे काम सुरू आहे याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तेथे भेट देणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री तातडीने तेथे रवाना झाले आहेत.

पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, त्या पर्यटन आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र बसून आराखडा तयार करावा अशा सूचना दिल्या आहेत. अधिवेशन संपल्यानंतर त्याबाबतच्या बैठका लावून आराखड्याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पर्यटन आराखडा मार्गी लावण्यासाठी जे काही करावे लागेल त्या सर्व गोष्टी आम्ही करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!