
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त कोरेगावमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय मेळावा झाला. यावेळी ‘मिशन-२५’ च्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
स्थैर्य, कोरेगाव, दि. २७ जून : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने कोरेगाव येथे जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला. बीएसआय मिशन-२५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा मेळावा घेण्यात आला असून, यामध्ये बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग नोंदवला.
या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे संघटक दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दादासाहेब भोसले यांनी ‘गाव तिथे शाखा’ ही संकल्पना राबविण्याचे आणि समता सैनिक दलाची उभारणी करण्याचे आवाहन केले. विजय ओव्हाळ यांनी धम्मप्रचार, संघटनात्मक शिस्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण यावर विशेष भर दिला.
बीएसआय मिशन-२५ चा आढावा
जिल्हा कोषाध्यक्ष नंदकुमार शिंदे यांनी मिशन-२५ मधील २५ कलमी कृती आराखड्याचे सविस्तर विश्लेषण करत तालुकानिहाय कामाचा आढावा घेतला. शाखा विस्तार, सदस्य नोंदणी, महिला सक्षमीकरण आणि संविधान जनजागृती हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १२ बौद्धाचार्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
आरक्षणातील उपवर्गीकरणावर चर्चा
अविनाश बारसिंग यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणावर भूमिका मांडत ३० जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात नानासो मोहिते यांनी संघटनात्मक शिस्त आणि धम्मप्रचाराचे महत्त्व स्पष्ट केले. या मेळाव्यास सुनील कदम, धनसिंग सोनवणे, बाळासाहेब जाधव यांच्यासह माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
