
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राजाळे येथील जानाई विद्यालयातील आरुष निंबाळकर व पुष्कर शिंदे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राजाळे (ता. फलटण) येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला मोठे यश मिळाले आहे. या विद्यालयातील इयत्ता सातवीचे विद्यार्थी आरुष युवराज निंबाळकर आणि पुष्कर भरत शिंदे हे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरामध्ये मोठे कौतुक होत असून, मार्गदर्शक शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांना मिळाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
या उज्वल यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सूर्यवंशी, मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी, नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी आणि ज्योती सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य जाधव, पर्यवेक्षिका काकडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.