
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२६ | नवी दिल्ली |
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या आठही खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती, कांदा उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न, पाणीप्रश्न, पायाभूत सुविधा आणि विमानतळांच्या नामकरणासह राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० मिनिटे झालेल्या या भेटीत राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज वारंवार ठप्प होत असल्याने सभागृहात महाराष्ट्राशी निगडित अनेक प्रलंबित प्रश्न मांडता आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वच्या सर्व आठ खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
‘पीएम केअर्स’ निधीतून गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मिळणार्या मदतीचा कोटा सर्व खासदारांसाठी वाढवावा, अशी मागणीही करण्यात आली. चंद्रभागा नदीचे प्रदूषण, कांद्याचे भाव आणि महाराष्ट्रातील अन्य स्थानिक प्रश्नांवरही खासदारांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.
‘एनडीए’तील समावेशाची चर्चा नाही
मतदारसंघांच्या फेररचनेचे विधेयक केंद्र सरकारने आणलेले नाही आणि मोदींसोबतच्या भेटीत त्यावर चर्चाही झालेली नाही, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. ‘विधेयकच नाही, तर त्याची चर्चा कशाला करायची?’ असा प्रश्न त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ‘एनडीए’मध्ये सामील होण्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या. महात्मा फुलेंची पगडी व छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदंड हातात असलेला पुतळा पंतप्रधानांना भेट दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले. भाजपविरोधात जनतेमध्ये असलेला रोष एकत्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक आहे. मात्र, अशा घटना घडताना त्यामागे वेगळा संदर्भ असतो.