पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलली – भिवंडीत पेपर लिकचा संशय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी होणारी राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलली असून भिवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

स्थैर्य, पुणे, दि. २७ जून : महाराष्ट्रात २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अचानक पुढे ढकलली आहे. भिवंडी येथे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय समोर आल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यातील १०२८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार होती. नीट परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षेचे सर्व उपाय योजना करण्यात आले होते. तरीही २७ जून रोजी पहाटे भिवंडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे काही संशयितांच्या ठिकाणांवर धाड टाकली.

या धाडीनंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, संशयितांकडे सापडलेले प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. यानंतर भिवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकतेने व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

Back to top button
Don`t copy text!