रणजितदादांच्यामुळे फलटण तालुक्यात तब्बल ८९०० घरकुलांना मंजुरी; अपात्र अर्जांचीही फेरछाननी होणार : आमदार सचिन पाटील

फलटण तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी तब्बल ८९०० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. तसेच, अपात्र ठरलेल्या १३०० अर्जांची पुन्हा छाननी करून लाभार्थ्यांना हक्काचे घर दिले जाणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील गरजू आणि गरीब कुटुंबांसाठी तब्बल ८९०० घरकुलांना शासनाने मंजुरी दिली आहे. युती सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या योजनेमुळे हजारो कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार असून, तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या अर्जांचीही नव्याने फेरछाननी केली जाणार आहे, अशी माहिती आमदार सचिन पाटील यांनी दिली आहे.

नेत्यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्याला ही मोठी मंजुरी मिळाली आहे. गरिबी आणि आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे घर बांधू न शकणाऱ्या नागरिकांना घरे देण्याचा मोठा आनंद असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. पात्र असलेल्या सर्व नागरिकांना घरकुल देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

अपात्र अर्जांबाबत आमदार सचिन पाटलांची ग्वाही

सध्या मंजूर झालेल्या घरकुलांसोबतच तब्बल १३०० अर्ज तांत्रिक अडचणींमुळे अपात्र ठरले आहेत. मात्र, या सर्व अपात्र अर्जांची लवकरात लवकर फेरछाननी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपात्र ठरलेल्या नागरिकांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे. फेरछाननीनंतर पात्र ठरणाऱ्या अर्जदारांनाही घरकुल मंजूर केले जाणार आहे.

Back to top button
Don`t copy text!