कोल्हापूर : पावनगडावर सापडले 400 शिवकालीन तोफगोळे; अजून हजारो असण्याची शक्यता


स्थैर्य, कोल्हापूर, दि.४: कोल्हापूरच्या पावनगडावर शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. पावनगडावर शेकडोच्या संख्येने तोफ गोळे सापडले असून, आणखी हजारो तोफ गोळे सापडण्याची शक्यता वनविभाग आणि टीम पावनगड या संघटनेने व्यक्त केली आहे. पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे गोळे मिळाले आहेत.

ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावन गडावर हे तोफगोळे सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली होती. 406 तोफगोळे सापडले अजून हजारो असण्याची शक्यता वनविभाग आणि टीम पावनगड यांचे म्हणणे आहे.

वनविभाग आणि टीम पावनगड ही संघटना पावन गडावरवर दिशादर्शक फलक लावण्याचे काम करत आहेत. याचवेळी फलकासाठी खड्डा काढत असताना गडावरील महादेव मंदिराशेजारी हे गोळे सापडले. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी याठिकाणी दारू गोळ्याचे कोठार होते.

पुरातत्त्व विभागाने पावनगड ताब्यात घ्यावा

राज्य शासनाने गड किल्ले संवर्धन करताना ज्याठिकाणी ऐतिहासिक वास्तु, पुरावे मिळण्याची शक्यता आहे असे गड किल्ले ताब्यात घेतले पाहिजेत. सध्याच्या घडीला राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने पावनगड ताब्यात घेऊन तेथे तातडीने उत्खनन करावे. जेणेकरून इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा, अनमोल वस्तू पुढे येतील. तसेच राष्ट्राच्या संपत्तीचे जतन संवर्धन आणि संरक्षण होईल असे राम यादव (सदस्य रायगड प्राधिकरण/ इतिहास अभ्यासक) यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!