नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर कोण होणार नवीन विधानसभा अध्यक्ष? या नेत्यांची नावे आहेत चर्चेत


स्थैर्य,मुंबई, दि. ४: काँग्रेस नेता नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या कुणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत. दरम्यान पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांचे नेते याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असे पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे, अमीन पटेल आणि के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे थोपटे यांनी संधी देऊन पुण्यात काँग्रेसचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

मुंबईतील आमदार अमीन पटेल यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. अमीन पटेल हे मुंबादेवी मतदारसंघांतून निवडून आले आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. विधानसभेत येण्यापूर्वी ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. दरम्यान शिवसेना मात्र अमीन पटेल यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास तयार होईल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पाथरी मतदारसंघातील आमदार सुरेश वारपूडकर यांचेही नाव समोर आले आहे. वारपूडकर हे 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री होते. ते 1998-99 मध्ये परभणीमधून खासदार सुद्धा झाले होते.


Back to top button
Don`t copy text!