सिंचन व्यवस्थेसह संपूर्ण कामकाजाच्या ज्ञानामुळे जयंत भांडवलकर एकाच जागी कार्यरत : रावसाहेब मोरे

दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२६ | फलटण |
नीरा उजवा कालवा विभाग हा स्वातंत्र्यपूर्वकाळात निर्माण झालेली आदर्श सिंचन व्यवस्था असून आजही ती उत्तम पद्धतीने कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेतील कार्यकारी अभियंता ते कालवा निरीक्षकापर्यंतची संपूर्ण कार्यपद्धती आत्मसात करून सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे कार्यरत राहील यासाठी प्रयत्नशील राहिल्यानेच जयंत भांडवलकर यांना नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सलग ३३ वर्ष मुख्य कार्यालयातच नियुक्ती देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

नीरा उजवा कालवा विभाग मुख्य कार्यालयातील संदेशवाहक जयंत भांडवलकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार व अभिष्टचिंतन सोहळ्यात अध्यक्षपदावरून कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे बोलत होते. यावेळी धोम-बलकवडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अकोला अमोल मस्कर यांच्यासह नीरा उजवा कालवा विभागातील अधिकारी, कर्मचारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि भांडवलकर यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार उपस्थित होता.

जयंत भांडवलकर संदेशवाहक असले तरी केवळ आपली जबाबदारी पूर्ण करण्यापलीकडे त्यांचा नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यक्षेत्र असलेल्या वीर धरण ते पंढरपूरपर्यंतच्या कालवा क्षेत्रातील मुख्य कार्यालय, उपविभागीय कार्यालय, शाखा कार्यालये त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि लाभधारक शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आणि उत्तम संवाद होता. सिंचन व्यवस्थेची पूर्ण माहिती असल्याने जयंत भांडवलकर यांचा संवाद कार्यकारी अभियंत्यांपासून सर्वच अधिकार्‍यांसाठी उपयुक्त किंबहुना मार्गदर्शक ठरत असल्यानेच त्यांना संपूर्ण सेवा कार्यकाळात एकाच जागी सेवेची संधी देण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत सेवानिवृत्तीनंतरही फलटण विभागात मंजूर आस्थापनेपैकी केवळ ३३ % जागेवर अधिकारी कर्मचारी नियुक्त असून उर्वरित जागा रिक्त असल्याने आगामी काळात जयंत भांडवलकर यांना काही काळ सेवेत सामावून घ्यावे लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी स्पष्ट केले.

भाटघर धरण उभारणी स्वातंत्र्यपूर्वकाळात झाली आणि त्यामधून डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी वापर सुरु होता, त्यानंतर भाटघरची क्षमता वाढवून २३.५ टीएमसी करण्यात आली आणि ९.५ टीएमसी क्षमतेच्या वीर धरणाची आणि उजवा कालव्याची निर्मिती केल्याने आज पंढरपूरपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांनी जयंत भांडवलकर यांचा नीरा उजवा कालवा विभागाचे ‘गुगल’ असा उल्लेख करीत या विभागातील सर्व स्तरावरची माहिती आणि कोणत्या वेळी काय निर्णय घेतल्यास नुकसान तर होणार नाही पण योग्य निर्णय झाल्याचेच सर्वांना मान्य करावे लागेल अशा प्रकारची निर्णय क्षमता असलेले हे व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.

कार्यकारी अभियंता अमोल मस्कर यांनी जयंत भांडवलकर यांचा शेतकरी यांच्याशी असलेल्या संवाद व संपर्काचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत माळशिरस उपविभागातील १९ फाट्यावर उद्धवलेल्या अडचणीत जयंत भांडवलकर यांच्या संवाद व संपर्कामुळे ताण तणाव टाळण्यात नेहमीच यश आल्याचे निदर्शनास आणून देत त्यांचा नीरा उजवा कालवा विभागातील कामाचा अनुभव आणि जनसंपर्क अवर्णनीय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

अन्य अधिकारी कर्मचार्‍यांनी जयंत भांडवलकर यांच्या स्नेहपूर्ण संबंध आणि उत्तम संवाद जपण्याच्या स्वभावामुळेच ते पाटबंधारे खात्यात अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असल्याचे आवर्जून सांगितले आणि त्यांना उर्वरित आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख समाधान लाभावे अशी परमेश्वरचरणी प्रार्थना केली.

प्रारंभी जयंत भांडवलकर व सौ. निर्मला भांडवलकर यांचा नीरा उजवा कालवा विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समारोप व आभार प्रदर्शन श्रीमती प्रियंका झुंजार यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!