
नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने सर्व प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाली असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ ऑगस्ट : फलटण तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील पाणीसाठ्याने उच्चांक गाठला असून धरण प्रशासनाने सांडव्यावरून आणि वीजगृहांद्वारे नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू केला आहे. भाटघर धरण १०० टक्के भरले असून नीरा नदीपात्रात १४ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्यात येत आहे.
नीरा खोऱ्यातील धरणांची ताजी स्थिती
नीरा खोऱ्यातील भाटघर धरण १०० टक्के भरले असून धरणात २३.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाटघर धरणाच्या पॉवर हाऊसद्वारे ७,००० क्युसेक आणि सांडव्यावरून १,६१५ क्युसेक असा एकूण विसर्ग सुरू आहे.
वीर धरण ९७.८५ टक्के भरले असून धरणात ९.२० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. वीर धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात १३,७१६ क्युसेक, डाव्या कालव्यात ७२७ क्युसेक आणि उजव्या कालव्यात १,५५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
नीरा देवघर धरण ९७.६३ टक्के भरले असून धरणात ११.४५ टीएमसी साठा झाला आहे. तेथून १६१४ क्युसेक आणि पॉवर हाऊसद्वारे ७५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरण ८९.४६ टक्के भरले असून ६७५ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
धोम बलकवडी धरणात मुसळधार; विसर्ग सुरू
कृष्णा खोऱ्यातील फलटणच्या दुष्काळी भागाला संजीवनी देणाऱ्या धोम बलकवडी धरणाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत १४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात ३.४४ टीएमसी म्हणजेच ८६.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणातून सध्या २,३१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे, तर जललक्ष्मी बोगद्याद्वारे ३३० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नीरा व कृष्णा नदीकाठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.