साहित्यिकांना एकत्रित करणारा हा ‘साहित्यिक संवाद’ आहे – महादेव गुंजवटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मानवी जीवनात संवाद माणसाची मने जोडून एकत्रित जगण्याचा मंत्र देत असतो. माणूस कितीही प्रगत झाला तरी त्याला आपले आचार, विचार व संहिता सोडून जगणे अवघड आहे. जीवनात चिंतन, मनन व सकारात्मक विचारांची फार गरज आहे. यातून निर्माण होणारे साहित्य हे सुंदर जीवन जगण्याची दिशा व प्रेरणा देते. त्यामुळे पडद्यामागचे साहित्यिक उजेडात आले पाहिजेत. प्रतिभासंपन्न साहित्यिक समाजमनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यिकांना एकत्रित करणारा हा ‘साहित्यिक संवाद’ आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांनी नाना-नानी पार्क, फलटण येथे आयोजित केलेल्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, प्रा. विक्रम आपटे, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महादेव गुंजवटे पुढे म्हणाले की, संवादातून माणुसकीची भिंत निर्माण झाली तर उत्तम प्रकारचे साहित्यिक घडतील व लिखाणाचा दर्जा सुधारून साहित्यिकांची आदर्श फळी निर्माण होईल.

यावेळी साहित्यिक संवाद आणि आनंद व साहित्य चळवळीतील अविस्मरणीय सुखद अनुभव याविषयी लेखिका सौ. सुलेखा शिंदे, रानकवी राहुल निकम, विनायक ननावरे, अ‍ॅड. रोहिणी भंडलकर, युवा साहित्यिक विकास शिंदे, कु. अस्मिता खोपडे, अ‍ॅड. वंदना सूळ, अ‍ॅड. शारदा दीक्षित, ज्ञानेश्वर कोरडे, पी. एम. काळे यांनी विचार व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे प्रा.विक्रम आपटे, प्रा. सुधीर इंगळे यांनी पूर्वीचे साहित्यिक लेखन कसे करायचे व आत्ता साहित्यिक कसे लिहितात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून रंजक पद्धतीने साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार सचिन जाधव यांनी मानले. यावेळी विनायक माने, उदय पवार, कु.साधना इंगळे तसेच अनेक साहित्य रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!