दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील सासकल येथे होत असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही गट राजे गट पुरस्कृत असून सत्तारूढ गटाचे अनुसूचित जाती प्रवर्गातील एक सदस्य तीन अपत्य असल्याने अपात्र झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. सत्तारूढ ग्रामविकास पॅनलचे तत्कालीन उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे अपात्र झाले असताना त्यांचे वडील धनाजी दगडू घोरपडे यांना पुन्हा उमेदवारी देऊन सत्तारूढ ग्रामविकास पॅनलच्या समर्थकांची नाराजी ओढवली आहे, तर विरोधी भैरवनाथ पॅनलच्या वतीने गत निवडणुकीतील उमेदवार राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना पुन्हा उमेदवारी देऊन आपला शब्द पाळला आहे.
मागील निवडणुकीत सासकल जनआंदोलन समितीने स्वतःचे उमेदवार दिल्यामुळे तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे भैरवनाथ पॅनलच्या गटाला मत विभाजनाचा फटका बसला होता. मात्र, सत्तारूढ गटाला त्याचा फायदा झाला होता. परिणामी यावेळी सासकल जनआंदोलन समितीने मत विभाजन टाळण्यासाठी आपला उमेदवार न देता भैरवनाथ पॅनलचे अधिकृत उमेदवार राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तशा स्वरूपाचे लेखी पत्र जनआंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, उपाध्यक्ष विनायक मदने व सल्लागार बी.डी. घोरपडे यांनी भैरवनाथ पॅनलचे प्रवर्तक हणमंत गंगाराम मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, सोपान रामचंद्र मुळीक, दीपक राऊसो मुळीक, ज्ञानेश्वर मुळीक, सदानंद मुळीक, कमलाकर आडके, दत्तात्रय मुळीक, मोहन रामचंद्र मुळीक, लहू शेठ सावंत, दिनेश मुळीक यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण प्रचारांमध्ये सासकल जन आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे भैरवनाथ पॅनलचे अधिकृत उमेदवार राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.