‘अजिंक्य’ भारत…


स्थैर्य, दि.२०: ऑस्ट्रेलियाच्या भूमीत जाऊन त्यांच्या मजबूत संघाला चारीमुंडया चीत करण्याच्या भीष्मपराक्रम भारतीय संघानं सलग दुसऱ्या वेळेला केला त्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन.कुठल्याही विजय आणि पराजयाची तुलना करता येत नसली,तरी सुद्धा २०१८-१९ पेक्षा हा विजय नक्कीच कौतुकास्पद आहे,कारण स्मिथ-वॉर्नर जोडगोळी यावेळी संघात होती तसेच विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर आपल्या कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला आणि आपले अनुभवी गोलंदाज टप्या-टप्याने जखमी होऊन संघाबाहेर पडत होते,त्यामुळे नवख्या संघाने केलेली ही कामगिरी नक्कीच अधोरेखित करावी लागेल.
         विराट आणि प्रमुख गोलंदाजांच्या उपस्थितीत पहिल्या म्हणजेच अँडिलेड कसोटी सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर (३६ ही भारतीय इतिहासातील निच्चांकी धावसंख्या) भारताने मेलबर्न कसोटीमध्ये विराट आणि शमीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधार रहाणेच्या शतकी कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची धूळ चारत मालिकेत पुनरागमन केलं,पण या कसोटी विजयानंतर भारताला उमेश यादवसारख्या जलदगती गोलंदाजाला मुकावं लागलं याचदरम्यान एक दिलासादायक गोष्ट होती,ती म्हणजे तिसऱ्या सामन्यापासून रोहित शर्मा संघात दाखल होणार होता आणि ही घटना नक्कीच चांगली होती कारण भारतीय संघाला सलामीच्या जोडीकडून मनासारखी सुरुवात मिळत नव्हती.
         सिडनी कसोटीमध्ये दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या ताकतीने मैदानात उतरले आणि स्मिथ सारखा बडा खेळाडू त्याच्या शतकी खेळीने लयीत परतला होता,त्याचसोबत लबुशेनने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी साकारून ऑस्ट्रेलियन संघाला आश्वासक स्थितीत नेऊन ठेवलं होतं.भारतीय संघासमोर स्टार्क,हेजलवूड,कमिन्स आणि नॅथन लायन सारखा तगडा गोलंदाजीचा चमू चेंडूगणिक भारतीय संघाला अडचणीत भर टाकत होता.एक परिस्थिती अशी होती की सामना जवळपास ऑस्ट्रेलियाकडे झुकला होता,पण विहारी-अश्विन या जोडीने ऑस्ट्रेलियन संघाच्या तोफखाण्यासमोर २५९ चेंडू खेळून काढले आणि अक्षरशः जखमी अवस्थेत तो सामना वाचवला किंबहुना त्यांनी सिडनीची खिंड हार न मानता लढवली आणि १९८० नंतर भारताने प्रथमच चौथ्या डावात १३१ षटक खेळून काढण्याचा पराक्रम केला.मैदानात जेवढ्या संकटांना भारतीय जेवढा समोर जात होता तेवढ्याच किंबहुना त्याहून जास्त दुर्दैवी संकटांना भारतीय संघाला सीमारेषेबाहेरून सुद्धा सामोरं जावं लागलं आणि ते जास्त लज्जास्पद होतं कारण ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी केली जातं होती.एकूणच परिस्थिती ही खडतर होती आणि या सामन्यानंतर भारतीय संघातील ४ अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडूंना(विहारी,अश्विन जडेजा आणि बुमराह) दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं.
           चौथा आणि शेवटचा निर्णायक सामना होता ब्रिस्बेन येथील गब्बा या मैदानावर जिथं ऑस्ट्रेलियन संघ ३२ वर्षांपासून अपराजित होता आणि त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार भारताला हरविण्यासाठी आतुर झाला होता. जे तिसऱ्या कसोटीच्या शेवटी त्याने ते स्टॅम्प माईक मध्ये बोलून दाखवलं ज्याला अश्विन ने सुद्धा तेवढ्याच खोचकपणे प्रत्युत्तर दिलं.पण,आता प्रतीक्षा होती ती या सामन्याच्या निकालाची.ब्रिस्बेन कसोटीमध्ये भारताच्या चमूत सर्वात अनुभवी गोलंदाज होता मोहम्मद सिराज,जो त्याच्या कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना खेळत होता आणि दोन गोलंदाजांनी या सामन्यात आपले पदार्पण केलं(नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर).भारतीय गोलंदाजांचा कस लागणार होता,हे निश्चितच होतं. पण त्याचसोबत भारतीय फलंदाजांचीही आता खरी ‘कसोटी’ लागणार होती.भारताच्या अननुभवी गोलंदाजांनी लबुशेनच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियन संघाला ३६९ धावांवर रोखल्यानंतर पहिल्या डावात भारतीय संघाची १८६-६ अशी बिकट अवस्था झाली.अश्या परिस्थितीत शार्दूल आणि वॉशिंग्टनने ‘सुंदर’ खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ३३६ धावसंख्येपर्यंत पोहोचवले,ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला ३३ धावांची निसटती आघाडी मिळाली.सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळपट्टीवर भेगा वाढत होत्या आणि त्याचप्रमाणे भारतीय चाहत्यांची धाकधूकही वाढत होती.दिवसाच्या शेवटी भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाली आणि पावसाला सुरुवात झाल्याने खेळ गुंडाळावा लागला.त्या पावसामुळे जितकी थंडी ऑस्ट्रेलियामध्ये पडली नसेल त्यापेक्षा जास्त थंड भारतीय चाहत्यांना वाटत होतं कारण ऑस्ट्रेलियन भेदक माऱ्यासमोर उभं राहण्याचा काही काळ वाचला होतं.पाचवा आणि शेवटचा दिवस उजाडला आणि भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होताच रोहित शर्मा तंबूत परतला.पण त्यानंतर आलेला पुजारा एक बाजू झेलत राहिला आणि दुसऱ्या बाजूने नवखा गिल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना फोडत राहिला.दोघांच्या भागीदारीनंतर अनिर्णित राखण्यासाठी खेळणाऱ्या भारतीय संघाची पावलं कसोटी जिंकण्याच्या दिशेने वळाली आणि त्या पावलांना पुजारा,पंत,गिल आणि सुंदरने आपल्या दर्जेदार खेळाडूंच्या मजबूत खेळीने आधार दिला आणि भारतीय संघाने विजयश्री २-१ असा खेचून आणला.
          महत्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती,दुखापतींचे ग्रहण आणि मालिकेवर ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून वर्णद्वेषी टिप्पणीचा डाग लागलेला असताना या नवख्या आणि तरुण संघाने ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या मायभूमीवर धूळ चारली ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.गिल च्या रूपात भारतीय संघाला एक सलामी फलंदाज मिळाला.मधल्या फळीत खेळायला जडेजा,अश्विन प्रमाणेच वॉशिंग्टन सारखा ‘सुंदर’ अष्टपैलू खेळाडू मिळाला आणि प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत स्मिथ,वॉर्नर आणि लबुशेन असे प्रतिभावान खेळाडू असणाऱ्या संघाला चितपट करणारे गोलंदाज भारतीय संघाला मिळाले आणि अश्या चमकदार कामगिरीवर चार चांद म्हणून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला…
-प्रतिक काटकर

Back to top button
Don`t copy text!