फलटण : गजानन चौक वृक्षतोडीवरून राजकारण – संदीप चोरमले यांचा आरोप


गजानन चौकातील वृक्षतोडीचा ठराव माजी नगरसेविका वैशाली चोरमले यांनीच मंजूर केला होता. आता त्यांचे आरोप चुकीचे आहेत, अशी टीका संदीप चोरमले यांनी केली.

स्थैर्य, फलटण, दि. 20 मे : गजानन चौकातील जीर्ण झाडे काढण्यावरून सध्या समाजमाध्यमांवर चर्चा सुरू आहे. मात्र, ही झाडे काढण्याचा ठराव माजी नगरसेविका वैशाली चोरमले यांनीच त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला होता. त्यामुळे आता घेतलेली आक्रमक भूमिका म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत, असा आरोप नगरसेवक संदीप चोरमले यांनी केला आहे.

ज्यांच्या घरात नगरसेवक पद होते, त्यांनीच गजानन चौकातील झाडे काढण्याचा ठराव सूचित करून मंजूर करून घेतला होता. याच ठरावाच्या आधारे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. आता या रस्त्यामध्ये चौक आणि झाडांचा समावेश असल्याने नगरपालिका यावर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. वैशाली चोरमले यांनी ठराव मंजूर केल्यामुळेच रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. आता विरोधक जाणीवपूर्वक विकासकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही कृती म्हणजे ‘जखम डोक्याला अन मलम गुडघ्याला’ या म्हणीसारखी आहे, अशी टीका संदीप चोरमले यांनी केली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आगामी पावसाळ्यात फलटण शहरात शेकडो देशी झाडांचे वृक्षारोपण व संगोपन करण्याचा मानस आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदारावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना झाडांबद्दल खरोखरच तळमळ आहे, त्यांनी विकासकामात आडवे न येता वृक्ष संगोपनाची जबाबदारी घ्यावी, असा टोला संदीप चोरमले यांनी लगावला.


Back to top button
Don`t copy text!