राज्यस्तरीय पीक स्पर्धेत (खरीप हंगाम) सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी; राज्यात पटकावले घवघवीत यश!


स्थैर्य, सातारा, दि 20 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय पीक स्पर्धा’ (खरीप हंगाम) अंतर्गत सातारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बाजरी आणि भात पिकांच्या भरघोस उत्पादनात या शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

राज्यस्तरीय विजेते शेतकरी (सातारा जिल्हा)

विजेत्याचे नाव गाव व तालुका पीक राज्यात क्रमांक
अशोक चंद्र नलावडे मु. पो. विरळी (ता. माण) बाजरी प्रथम
सविता मुळीक मु. पो. सासकल (ता. फलटण) बाजरी द्वितीय
चंद्रकांत लाड मु. पो. करंजे तर्फे परळी (ता. सातारा) भात तृतीय

पीक स्पर्धा योजनेचा मुख्य उद्देश:

राज्यांतर्गत ही योजना राबवण्यामागे कृषी विभागाचे खालील प्रमुख उद्देश आहेत:

  • प्रयोगशील आणि विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढवणे.

  • शेतकऱ्यांनी उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा, याला प्रोत्साहन देणे.

  • कृषी उत्पादनात भर घालून राज्याच्या एकूण कृषी-उत्पादनात मोलाची वाढ करणे.

  • या विजेत्या व यशस्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून परिसरातील इतर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.

पुढील टप्प्यातील निवड प्रक्रिया आणि बक्षीस वितरण:

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • राज्यस्तरावरील विजेते निश्चित झाल्यानंतर, आता उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तर आणि तालुकास्तरावरील विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

  • या स्पर्धेत सर्वसाधारण गट आणि आदिवासी गट यांच्याकरिता स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहेत.

  • या दोन्ही गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते जाहीर करून त्यांना सन्मानित केले जाईल.


Back to top button
Don`t copy text!