कार्यकाळ संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात ज्येष्ठ नगरसेवकांनी करून घेतला होता तो ‘ठराव’ : दादासाहेब चोरमले


गजानन चौकातील जुना ठराव केवळ जीर्ण व धोकादायक झाडे काढण्यासाठी होता. निरोगी झाडे तोडण्यास आमचा ठाम विरोध असल्याचा उलगडा दादासाहेब चोरमले यांनी केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 20 मे : गजानन चौकातील वृक्षतोडीच्या जुन्या ठरावावरून सुरू असलेल्या चर्चेवर दादासाहेब चोरमले यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. नगरपरिषदेच्या पाच वर्षांपूर्वीच्या ठरावात केवळ जीर्ण आणि धोकादायक झाडे काढण्याची नोंद होती. त्यामुळे सध्या धोकादायक नसलेली निरोगी झाडे तोडण्यास आपला ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केवळ जीर्ण झाडांचा होता ठराव

नगरपरिषदेचा कार्यकाळ संपत असताना ज्येष्ठ नगरसेवकांकडून विकासकामांचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यावेळी गजानन चौकातील सुशोभीकरणासाठी केवळ जीर्ण व धोकादायक झाडे काढण्याचा ठराव झाला होता. त्यावर सूचक म्हणून वैशाली चोरमले यांचे नाव होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते, गटनेते आणि विद्यमान नगराध्यक्ष यांनाही ही वस्तुस्थिती माहिती आहे, असे दादासाहेब चोरमले म्हणाले.

निरोगी झाडे तोडण्यास विरोध

तत्कालीन परिस्थितीत त्या ठरावाची अंमलबजावणी झाली असती, तरी चांगल्या झाडांना आपला विरोधच राहिला असता. आपण नेहमी निसर्गावर प्रेम करणारे आणि वृक्षसंवर्धन करणारे कार्यकर्ते आहोत. शेकडो वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केल्याचे फलटणकरांना ज्ञात आहे. जागतिक तापमानवाढ पाहता पर्यावरणाची हानी करून केलेला कोणताही विकास मान्य नाही. त्यामुळे सध्या धोकादायक नसलेली मोठी झाडे काढण्याला कडाडून विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. जुना ठराव आणि आपली सध्याची भूमिका यात कोणतीही विसंगती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विकास निधीवरून सत्ताधाऱ्यांना सवाल

मालोजीराजे पुतळा ते टोपी चौक परिसराच्या सुशोभीकरणासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यासाठी काही प्रमाणात टेंडर नोटिसाही निघाल्या होत्या. मात्र, सत्तांतरानंतर हा निधी माघारी पाठविण्यात आला. आता त्याच कामांची नावे बदलून हा निधी पुन्हा आणण्यात आला असून, सत्ताधारी गटाने याचा खुलासा करणे गरजेचे आहे. चांगल्या विकासकामांना आपला नेहमीच पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!