मंत्र्यांनीच सुसंस्कृतपणा सोडला तर इतरांचे काय ?


राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे कोणीच सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती सध्याला निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट जनादेश दिलेला होता. परंतु आपापसातील हेवेदाव्यामुळे किंवा मुख्यमंत्री पदावर कोण बसणार ? यासाठी दोघेही अडून बसल्याने राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार तयार झाले. त्यामध्ये खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यामध्ये आत्ता नुकतेच झालेले सत्तांतर सुद्धा संपूर्ण राज्याने बघितले आहे. भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेमधील 40 हून अधिक आमदार कसे गेले व त्या चाळीस आमदारांचा प्रमुख कसा मुख्यमंत्री झाला हे सर्वांनीच पाहिले आहे.

हे सर्व होत असताना तत्कालीन सत्ताधिकारी तत्कालीन विरोधक यांच्यामध्ये बरेच दावे व प्रतिदावे एकमेकांवर होत होते. परंतु काही अपवाद वगळता कोणीही खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणे टाळत होते. काल नुकतीच राज्यातील एका मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या एका महिला नेत्यावर कोणता शब्द वापरत टीका केली. आपली टीव्हीवर चालणाऱ्या न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना या सर्व गोष्टी पाहताना नक्की राज्याची संस्कृती कोणत्या दिशेला जात आहे, हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याला एक सुसंस्कृतपणाची संस्कृती आहे. राज्यातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करताना कधीही त्यांनी पातळी सोडलेली आढळलेली नाही. विद्यमान मंत्रीच जर असे बोलत असतील तर कार्यकर्त्यांनी यातून कोणता धडा घ्यायचा ? असे प्रश्न तयार होत आहेत.

देशातील इतर राज्य पाहता महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृतपणा कायमच जाणवत आलेला आहे. राज्यातील पूर्वीच्या नेत्यांनी सुद्धा कधी आपला सुसंस्कृतपणा सोडलेला नव्हता व आरोप करताना कधीही खालच्या पातळीला जाऊन आरोप झालेले या राज्याने पाहिलेले नाहीत. आता राज्यामध्ये सर्वच गोष्टी बदलत असताना दिसत आहेत. विद्यमान मंत्री जर अशा शब्दात बोलू लागले तर कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक काय करणार किंवा काय बोलणार हेही आता आगामी काळामध्ये राज्याला पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा संपूर्ण देशाने बघितलेला आहे. कट्टर विरोधात असताना सुद्धा स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन यांची मैत्री सुद्धा संपूर्ण देशाने बघितलेली आहे. राजकारणाच्या ठिकाणी आरोप करताना प्रत्येक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आलेले आहेत. परंतु खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे सर्वांनीच आज पर्यंत काही अपवाद वगळता पाळलेले होते. परंतु राज्याचे विद्यमान मंत्री जर खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील, तर याबाबत कोण व कोठे आवाज उठवणार हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही.

राज्यामध्ये या पूर्वी आपल्या प्रदेशातील बोलीभाषेमध्ये अनेक नेते बोललेले आढळून आले आहेत. परंतु दुसऱ्या पक्षातील नेत्यावर त्यामध्ये सुद्धा महिला नेत्यावर बोलताना टीका अनेक जणांनी केलेल्या आहेत. परंतु विद्यमान मंत्री पातळी सोडून कोणीही महिला नेत्यांवर बोललेले नाही. भारतीय जनता पक्ष हा एक विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु आता जर भारतीय जनता पार्टी ज्या वेळी सरकार मध्ये आहे. त्यावेळी नेमके आता त्यांच्या मंत्र्याचे समर्थन करणार कि त्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार ?. यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जरी तो मंत्री भारतीय जनता पार्टीचा नसला तरीही भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये तो मंत्री आहे. त्यामुळे नक्की भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असेल, हेच महत्वाचे ठरणार आहे.

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,
संपादक, दैनिक स्थैर्य


Back to top button
Don`t copy text!