पशुधन सुरक्षित तर शेतकरी सुरक्षित! ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांचे महत्त्व


जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त विशेष लेख: पशुधनाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व, पशुवैद्यांची भूमिका आणि सार्वजनिक आरोग्य व अन्नसुरक्षेत त्यांचे असणारे अमूल्य योगदान यावर प्रकाश टाकणारा लेख.

पशुधन हे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याचे प्रमुख साधन आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या हाती दररोज रोख उत्पन्न येते. शेळ्या-मेंढ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो, तर कुक्कुटपालन व्यवसायातूनही चांगला आर्थिक फायदा होतो. याशिवाय, पशुधन संगोपनातून शेतीसाठी उत्तम दर्जाचे शेणखत, लेंडी खत आणि कोंबडी खत उपलब्ध होते. यामुळे जमिनीची सुपीकता जपण्यास मदत होतेच, शिवाय खत विक्रीतून अतिरिक्त आर्थिक फायदाही होतो. शेतीकामांमध्ये बैलांची मदत ही अनन्यसाधारण आहे. या सर्व कारणांमुळे पशुधन निरोगी व सुरक्षित ठेवणे ही आता एक ‘राष्ट्रीय गरज’ बनली आहे.

पशुवैद्यकीय सेवांची भूमिका:

पशुवैद्यकीय सेवा हा खऱ्या अर्थाने पशुपालनाचा ‘कणा’ आहे. गाव पातळीवर पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी हे पशुपालकांना आरोग्याबाबत आणि संगोपनाबाबत योग्य मार्गदर्शन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतात. त्यांच्या या सेवेमुळेच ग्रामीण भागातील पशुधन सुरक्षित राहण्यास मदत होते.

जागतिक पशुवैद्यकीय दिन:

दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘जागतिक पशुवैद्यकीय दिन’ (World Veterinary Day) साजरा केला जातो. या विशेष दिवशी पशुवैद्यकीय सेवांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पशूंच्या आरोग्याबाबत समाजात जनजागृती करणे, तसेच रोग नियंत्रण व लसीकरणाबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

या दिवसाच्या निमित्ताने पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे योगदान गौरविले जाते. आजच्या काळात पशुवैद्य हे केवळ प्राण्यांवर उपचार करणारे डॉक्टर राहिलेले नाहीत, तर ते ‘अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याचे खरे रक्षक’ आहेत. ते अन्नसाखळीचे रक्षक, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षक, पर्यावरणपूरक अन्नप्रणालीचे समर्थक आणि जागतिक आरोग्य सुरक्षेचे प्रमुख घटक बनले आहेत.

महामारीत महत्त्वाची भूमिका:

महामारी आणि रोगप्रसाराच्या (उदा. लम्पी आजार, बर्ड फ्लू) काळात पशुवैद्य आपत्कालीन उपचार सेवा पुरवतात. रोग नियंत्रण उपाय राबवून ‘जैव सुरक्षा’ (Biosecurity) सुनिश्चित करण्याचे काम ते करतात. त्यांच्या या तत्परतेमुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. थोडक्यात सांगायचे तर, पशुवैद्य हे केवळ प्राण्यांचे मित्र नसून ते अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यायाने संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भक्कम ‘आधारस्तंभ’ आहेत.

– लेखक व संकलक : सुजित निंबाळकर, राजाळे


Back to top button
Don`t copy text!