‘लालपरी’शिवाय शाळा-कॉलेजला जायचं कसं?, विद्यार्थ्यांचा प्रशासनाला सवाल


 

स्थैर्य, मायणी (जि. सातारा), दि.१८ : कोरोनामुळे बंद असलेली शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील एसटी बसफेऱ्या अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्याने “लालपरी’शिवाय शाळा कॉलेजला जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावू लागला आहे. 

शालेय शिक्षण विभागाने दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सुमारे आठ महिन्यांपासून घरीच बसून कंटाळलेले विद्यार्थी आनंदून गेले आहेत. कधी एकदा शाळा कॉलेजला जातोय असे वाटू लागले आहे. अनेक जण शाळा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुक्तपणे कशी मौजमजा करायची याबाबत स्वप्ने रंगवू लागले आहेत, तर मुले शाळा, कॉलेजला जाणार असल्याच्या विचाराने पालकांचाही ताण कमी होऊन हलके वाटू लागले आहे. दीपावलीबरोबरच आता शाळा-विद्यालयांत जाण्यासाठीची तयारी व त्यासंबंधीची चर्चा घरोघरी सुरू झाली आहे. मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर उभे ठाकले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना पालकांनी स्वतः वाहनाने शाळा-विद्यालयात आणून सोडायचे आहे. मात्र, अनेक पालकांकडे वाहनांची सोय नाही. असे पालक मुलांना शाळा विद्यालयात पोचविणार कसे? याची चिंता पालक व शाळा व्यवस्थापनांना लागली आहे. 

दरम्यान, एसटी बस गाड्या राज्यभर सुरू झाल्या असल्या, तरी अपवाद वगळता केवळ लांब पल्ल्याच्याच गाड्या सुरू असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सद्यःस्थितीत खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांवरील सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाची गैरसोय तर आहेच; पण बसअभावी ग्रामीण भागातील मुले व विशेषत: मुली शाळा, विद्यालयात पोचणार कशा? हा प्रश्न अधिक गंभीर आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील बस फेऱ्या पूर्ववत व नियमित सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. म्हणून शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू होण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा ऑनलाइन शिक्षणाप्रमाणे ठराविक विद्यार्थीच प्रत्यक्ष शाळा कॉलेजमध्ये येऊन ऑफलाइन शिक्षणाचा लाभ घेतील. ऑनलाइनपासून वंचित असलेले विद्यार्थी ऑफलाइन शिक्षणालाही मुकण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापनाकडून होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!