
स्थैर्य, सातारा, दि. १४ : माझ्या देहाची राख माझ्याच मातृभूमीवर पडावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांची ती पूर्णही होत असेल. मात्र, अनेक ज्ञात आणि अज्ञातांची स्मशानभूमीतील ही रक्षा आज सर्व श्रमिक कचरा वेचक संघ आणि श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नाने सेंद्रिय खताची मात्रा म्हणून अनेकांच्या बागेत, शेतकर्यांच्या शेतातील पिकांना, गच्चीवरील परसबागेतील झाडांना नवे जीवन देत आहे. मानवी रक्षेपासून सेंद्रिय खत बनवणारी केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ही पहिलीच कचरा वेचक संघटना असावी.
प्रकाश भिसे आणि सचिन पवार यांच्या प्रयत्नांमुळे येथील छ. प्रतापसिंह उर्फ दादामहाराज भाजी मंडईच्या पिछाडीला असलेल्या नगरपालिकेच्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पात भाजी मंडईतील टाकाऊ पदार्थापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येत आहे. असे खत तयार होण्यास खूप वेळ लागतो हे त्यांच्या लक्षात आले आणि असे सेंद्रिय खत तयार करताना जर आपण मानवी रक्षेचा वापर केला तर खत लवकर तयार करता येईल का असा प्रश्न त्यांना पडला. यावर भिसे यांनी एक छोटासा प्रयोग केल्यानंतर हे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सातारा येथील कैलास स्मशानभूमीत अशी रक्षा मिळण्याची सर्वात जास्त खात्री असल्याने त्यांनी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्याशी संपर्क साधून आपल्या या उपक्रमाबाबत सांगितले. चोरगे यांनीही त्यांना तातडीने होकार देत येथील रक्षा नेण्यास परवानगी दिली आणि हा प्रयोग सुरू झाला. राखेत पाणी शोषून घेण्याचे प्रमाण अधिक असल्याने पूर्वी 120 दिवसांनंतर तयार होणारे सेंद्रिय खत आता केवळ 60 दिवसात तयार होवू लागले आहे.
या ठिकाणी तयार होणार्या सेंद्रिय खताला चांगली मागणी आहे. शहरातील अनेकांनी या सेंद्रिय खताचा वापर करून आपली परसबाग व कुंड्यातील रोपे वाढवली आहेत. अनेक शेतकर्यांनी हे खत आपल्या शेतात वापरले आहे. विशेष म्हणजे या खताने रोपांची वाढ जोमदार आणि चांगली होत असल्याचे अनेकांनी सांगितले. या खताचा वापर पालिकेच्या बागांसाठी होत आहे. यंदाच्या वर्षी 15 ते 20 टन खतनिर्मितीचे उद्दिष्ट सर्व श्रमिक कचरा वेचक संघटनेने ठेवले आहे. मानवी रक्षा आणि भाजी मंडईतील टाकाऊ पदार्थांपासून सेंद्रिय खत निर्मिती करणारा हा बहुधा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असावा असे सांगत प्रकाश भिसे यांनी पालिका मात्र याबाबत उदासीन असल्याचे सांगितले.