
कोकणातील गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे साताऱ्यात आंब्याची आवक घटली असून, अक्षय तृतीयेनंतरही देवगड हापूसचे दर ८०० ते १३०० रुपये डझनावर पोहोचले आहेत. रत्नागिरी आणि पायरी आंब्याचीही आवक कमी आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २१ : कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूस आंबा सध्या साताऱ्याच्या बाजारात डझनाला तब्बल ८०० ते १३०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. कोकणातील बदलते हवामान आणि अवकाळी गारपिटीमुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, यामुळे आवक घटली आहे. परिणामी, आंब्याचे दर कमी होण्याची शक्यता सध्या तरी फारच धूसर दिसत आहे.
अक्षय तृतीयेनंतरही दर ‘जैसे थे’
दरवर्षी अक्षय तृतीयेनंतर सहसा आंब्यांचे दर काहीसे स्थिरावतात किंवा घटतात. मात्र, यंदा बाजारात तसे चित्र दिसत नाही. देवगड हापूससोबतच पायरी आंब्यांचे दरही ‘जैसे थे’ टिकून आहेत. कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे बाजारातील आंब्याच्या दरात जास्त प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येत नाही. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसत असला, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या वाढीव दरामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
गारपिटीमुळे उत्पादनात मोठी घट
आंब्याचा हंगाम ऐन मोसमात आलेला असतानाच कोकणात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. त्यातच हवामानात अचानक झालेल्या बदलांचा मोठा फटका आंब्याच्या बागांना बसला. त्यामुळे दरवर्षी राज्यभर जी मोठ्या प्रमाणावर आवक होते, त्यामध्ये यंदा लक्षणीय घट झाली आहे. आवक घटल्यानेच देवगड हापूसच्या दरात जास्त प्रमाणात चढ-उतार झाला नाही. तसेच रत्नागिरी व पायरीचे दरही चढेच राहिले आहेत.
“सध्या बाजारात देवगड हापूस उपलब्ध आहे. या आंब्याचा दर डझनाला ८०० ते १२०० रुपयांपर्यंत आहे. मात्र, रत्नागिरी व पायरी या आंब्यांची आवक बाजारात फारच कमी प्रमाणात आहे. पुढील काही दिवसांत हे दोन्ही प्रकारचे आंबे बाजारात येण्याची शक्यता आहे.”
– इरफान बागवान (आंबा व्यापारी)

