शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही – पालकमंत्री गिरीष महाजन


दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । नांदेड । गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले. राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले होते. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा देता येईल हे पहावे, असे स्पष्ट केले. आज त्यांनी प्रत्यक्ष बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला.

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाच्या या दौऱ्यात त्यांच्या समवेत आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, संबंधीत विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

झालेल्या नुकसानीची एक भुमिपूत्र म्हणून मला जाणीव आहे. मी सुद्धा केळी उत्पादक शेतकरी आहे. हाताशी आलेली केळी निसर्गाच्या अशा अवकृपेने निघून जाते तेंव्हा शेतकऱ्यांना होणारे दु:ख व सोसावे लागणारे आर्थिक नुकसान याची कल्पना करवत नाही. शेतकऱ्यांसाठी शासन अधिक सकारात्मक आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्याबाबत त्यांनी सभागृहालाही वस्तुस्थिती अवगत करून हे सरकार शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या नुकसानीबद्दल आम्ही अधिक सजग असून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ पंचनामे पूर्ण करून त्यांना मदतीबाबत तात्काळ कार्यवाही करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

पाटनूर येथे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. निसर्गाचा लहरीपणा हा अलिकडच्या काळात वाढत चालला आहे. यात विशेषत: मार्च, एप्रिल, मे मध्ये गारपीटमुळे होणारे नुकसान आव्हानात्मक झाले आहे. वादळ, वारे, अतिवृष्टीसह विमामध्ये गारपिटीचाही समावेश करणे आवश्यक आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनीही आता विमाबाबत अधिक काळजी घेऊन गारपिटीचाही अंर्तभाव कसा होऊ शकेल याची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची संपूर्ण पाने फाटून गेली आहेत. अशा स्थितीत केळीची फळधारणा ही अशक्य आहे. एकदा केळीची पाने फाटली एकप्रकारे हे संपूर्ण पिक हातातून गेल्यासारखे आहे. ज्याठिकाणी गारपिटीमुळे असे नुकसान झाले आहे त्यांना वास्तविक प्रत्येक झाड काढणेही आता खर्चिक आहे. या नुकसानीचा सर्व अंदाज शासनाने लक्षात घेतला असून अधिकाअधिक मदतीची भुमिका आमच्या शासनाची आहे, असे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी स्पष्ट केले.

पांढरवाडी शिवार येथे गोविंद चित्तलवाड यांच्या केळीचे झालेले नुकसान, कापावार शेंबोलीकर यांच्या टोमॅटोचे झालेले नुकसान तर पाटनूर शिवारातील जगदीश उपाध्याय, गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. प्रारंभी शासकीय विश्रामगृह येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल ती करण्याचा आग्रह धरला.

नियोजन भवन येथे पालकमंत्री यांनी विभाग प्रमुखांकडून घेतला आढावा

नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 19 हजार 899 एवढी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यात जिरायत बाधित क्षेत्र 11 हजार 376 हेक्टर असून बागायत बाधीत क्षेत्र हे 10 हजार 636 असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे 1 हजार 542 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाचे बाधित क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड, लोहा, हदगाव, देगलूर, हिमायतनगर, कंधार, किनवट आदी तालुक्यांचा यात समावेश आहे. या गारपिटीमुळे 917 शेतकरी बाधित आहेत. सद्यस्थितीत एकुण 698 हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. उरलेले पंचनामे येत्या 4 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. याचबरोबर विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा व्हावी यासाठी विमा कंपन्यांना निर्देश करण्याची मागणी करून लेखी निवेदन दिले. याचबरोबर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार  राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांना नुकसानीबाबत माहिती देऊन तात्काळ पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!