शिक्षकाला सन्मान दिल्यास ‘छतावरली माणसं’सारखं लेखन निर्माण होते – अरविंदभाई मेहता


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
शिक्षक हा गावचा मार्गदर्शक असायला हवा, आदर्श गाव घडवायचं काम शिक्षकाने करायला हवं. शिक्षण व्यवस्थेकडून दिल्या जाणार्‍या इतर कामांना संघटनांनी तीव्र विरोध करायला हवा. समाजाकडून शिक्षकाला सन्मान दिला गेला पाहिजे तरच प्रेरणा विचारमंचसारखे प्रबोधनाचं काम आदर्श शाळा सांभाळून एखादा शिक्षक करू शकेल. माणसातलं माणूसपण शोधू शकेल. त्यातून ‘छतावरली माणसं’सारखं लेखनही निर्माण होईल. आमचं पत्रकारांचं बळ आपल्या पाठीमागे आहेच, असे गौरवोद्गार यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी काढले.

’छतावरली माणसं’ ’या सुनील विजय तिवाटणे लिखित कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी रविंद्र बेडकिहाळ, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ शाखा फलटण व सौ. अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मेहता बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता होते तर प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय दगडे, साद प्रकाशन पुणेचे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव, मठपती, भाग शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती फलटण, पारसे, केंद्रप्रमुख, रणवरे, केंद्रप्रमुख, निकाळजे केंद्रप्रमुख आणि गोखळी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र भागवत, अतुल कोकणे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर, सुभाष ढालपे, सौ. जयश्री कदम, लेखक जनार्दन गार्डे, कवी नरुटे, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र कापसे, जाधववाडीचे उपसरपंच दीपक सपकळ, ग्रामस्थ, शिक्षक, मित्रमंडळ, आप्तेष्ट, कुटुंबातील सदस्य, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मला माणसं वाचायची सवय आहे. लेखकापेक्षाही एक उत्तम माणूस म्हणून तिवाटणे सरांची ओळख जास्त आहे. एखादी गोष्ट वाचून त्याचे इम्प्लिमेंटेशन करणारे समर्पण वृत्तीने झोकून देणारे हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. मुलांना लिहिते करण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. बापाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलाची धडपड पाहता येणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक बाप म्हणून ती निश्चित आनंद देणारी आहे. हा कार्यक्रम पाहताना मला ते जाणवलं, असे फलटण पंचायत समितीचे भाग शिक्षण विस्तार अधिकारी मठपती यांनी यावेळी म्हटले.

प्रत्येक शाळेत हे पुस्तक विकले गेले पाहिजे. शिक्षक हा समाजपरिवर्तन घडवणारा घटक आहे. संघर्ष हा शांततेने व संयमाने करता आला पाहिजे. समाज बांधणीचं काम शिक्षकाकडून घडायला हवं. बेडकिहाळ सर लेखक घडवण्याचे काम करत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व्याख्यानमालेतून प्रबोधनाचा काम आणि आपल्या लेखनातून लढणारी माणसं हवीत, रडणारी नको या व्यक्तिरेखा तिवाटणे सरांनी साकारलेल्या आहेत, असे मत शुभेच्छा रमेश आढाव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व साद पब्लिकेशन पुणेचे प्रकाशक दत्तात्रय दगडे यांनी पुस्तकाचा गाभारा स्पष्ट करताना, ‘शब्दसुमानांची करूनी गुंफण, समाधानी व्हावे वाचक मन’ असे हे पुस्तक आहे. १३ कथांचा हा गुलदस्ता आहे. पुस्तक प्रकाशनामध्ये लेखकाला अनेक अडचणी येतात; परंतु त्या पार करून लेखक सुनील तिवाटणे यांनी व्यक्तिरेखा रेखाटण्याबरोबरच विनोदाची झालर कथांमध्ये दिली आहे, हे स्पष्ट केले.

हा प्रकाशन सोहळा ज्यांच्या हस्ते पार पडला, असे रविंद्र बेडकिहाळ सर, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांनी शिक्षकांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद झाले पाहिजे, लिहिते झाले पाहिजे, असे आवाहन केले.

आपला मुलगा शिक्षक झाला, लेखक झाला, याचा आनंद आपल्या कुटुंबीयांना खूप मोठा आहे. शब्दात सामर्थ्य असते, शब्द जाणूनबुजून वापरू नये. शब्द आतून आला पाहिजे, शब्द वापरल्यानंतर श्रोत्यांच्या चेहर्‍यावर त्याचा परिणाम दिसला पाहिजे. महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ या दोन शब्दांचा परिणाम देशाने पाहिला आहे. शब्दांना नैतिकतेचे अधिष्ठान हवे. प्रत्येकाने समाजाप्रती आपली भूमिका निश्चित केली पाहिजे. तिवाटणे सरांच्या कथा वाचताना ते जाणवेल. ‘निर्भया ते तेजस्विनी’ ही कथा तर घराघरात वाचायला हवी. समाजाला सावरण्याचं, भान देण्याचं काम लेखकाकडून होत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

एका शिक्षकासाठी सोनगावसारखे गाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून हे शिक्षक आम्हाला हवेत, सरांची बदली करू नका, असं म्हणत असेल तर त्या शिक्षकाचे गावाप्रती किती प्रेम होते, हे स्पष्ट होते. त्यांनी मुलांच्या बसवलेल्या नाटिकांमुळे आम्हालाही जिल्ह्यापर्यंत अनेकवेळा जाण्याची संधी प्राप्त झाली, असे हे कलारसिक, नाट्यलेखक व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी लेखक, कवी, डॉक्टर, इंजिनियर आहेत, असे केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे यांनी सांगितले.

प्रास्ताविक लेखक भिमराव लोंढे यांनी केले तर सूत्रसंचलन सचिन काकडे यांनी केले. आभार प्रेरणा विचार मंच गोखळीचे अध्यक्ष गंगाराम गावडे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा विचार मंच गोखळी व अष्टविनायक ग्रुप जाधववाडी यांच्याकडून करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!