उन्हाचा तडाखा वाढला, लिंबू झाले महाग! साताऱ्यात १० रुपयाला १, तर २० रुपयाला ३ लिंबे


 वाढत्या उन्हाळ्यामुळे साताऱ्यातील राजवाडा परिसरातील भाजी मंडईत लिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे. १० रुपयाला एक आणि २० रुपयाला ३ या चढ्या दराने विजापूरची हिरवी लिंबे विकली जात आहेत.

स्थैर्य, सातारा : वाढत्या उन्हाचा तडाखा एकीकडे सातत्याने वाढत असतानाच, शहरात सरबतासाठी आवश्यक असणाऱ्या लिंबांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, साताऱ्यातील राजवाडा परिसरातील ‘श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले फळे, फुले व भाजी मंडईत’ तहान भागवणाऱ्या आंबट लिंबांच्या दराने मात्र कमाल पातळी गाठली आहे. सध्या बाजारात चक्क १० रुपयाला एक छोटे आणि २० रुपयाला तीन या चढ्या भावाने लिंबांची विक्री होत आहे.

विजापूरहून हिरव्या लिंबांची आवक

या मंडईत सध्या विजापूर परिसरातून लिंबांची आवक होत आहे. मात्र, ही लिंबे नेहमीप्रमाणे पिवळ्या धमक रंगाची नसून हिरवी आहेत. तसेच, ती आकाराने छोटी आणि रसालाही कमी असल्यामुळे त्यातून निघणारा लिंबाचा रस कमी प्रमाणात असतो. असे असले तरी, उन्हाळ्यामुळे सरबतांसाठी सध्या लिंबांना मोठी मागणी आहे. त्यामुळे ग्राहकांना शक्य त्या कमी दरात ही लिंबे देण्यासाठी विक्रेत्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

लिंबे ताजी ठेवण्यासाठी विक्रेत्यांची कसरत

विक्रीसाठी आणलेली ही हिरवी लिंबे उन्हामुळे सुकू नयेत आणि ती रसरशीत व ताजी राहावीत, यासाठी विक्रेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. लिंबे ताजी दिसावीत यासाठी त्यांच्यावर सातत्याने थंड पाण्याचा बाटलीतून कारंज्यासारखा शिडकावा करावा लागत असल्याचे चित्र मंडईत दिसत आहे.

(छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!